Nagpur BJP MLA Sandeep Joshi Announces Retirement from Active Politics: भाजपा आमदार आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी अचानक राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोशी यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच त्यांनी हा निर्णय घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, नवीन पिढीला संधी देण्यासाठी आपण सक्रिय राजकारणातून बाजूला होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ...
आपल्या निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी संदीप जोशी यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझ्यासाठी राजकारण हे कधीच पद किंवा प्रतिष्ठेचे साधन नव्हते, तर ते निस्वार्थ सेवा आणि समर्पणाचा मार्ग होता. सध्याच्या राजकारणात सत्तेसाठी होणारे पक्षांतर, वाढलेली संधीसाधू वृत्ती आणि गळेकापू स्पर्धा यामुळे केवळ सामान्य मतदारच नाही तर निष्ठावान कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहेत. अशा परिस्थितीत पद सोडून देण्याचा विचार आपल्या मनात पक्का झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत 'पॉवर गेम' महापौरपदी कुणाची होणार निवड? वाचा कोण आहेत प्रबळ दावेदार )
गडकरी आणि फडणवीसांची मागितली माफी
संदीप जोशी यांनी आपल्या या निर्णयासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पक्षानं मला नेहमीच मोठी पदे दिली आणि सन्मान केला. मात्र, आता तरुण प्रतिभेला वाव देणे काळाची गरज आहे. म्हणूनच अत्यंत विचारपूर्वक मी माझ्या राजकीय प्रवासाला पूर्णविराम देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण या निर्णयाची कल्पना देऊन आपली भूमिका सविस्तरपणे समजावून सांगितली असल्याचेही त्यांनी या पत्रात सांगितले.
संदीप जोशी सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचा हा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. पक्षानं दिलेली ही जबाबदारी आपण तोपर्यंत पूर्ण निष्ठेने पार पाडू, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, 13 मे नंतर आपण पक्षाकडे कोणत्याही तिकिटाची मागणी करणार नाही आणि जर पक्षानं तिकीट दिले तरीही आपण ते विनम्रपणे नाकारू, असे त्यांनी जाहीर केले. आपल्या जागी पक्षातील एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : TMC Election 2026 : ठाण्यात शिवसेनेचेच वर्चस्व; महापौरपदासाठी 'ही' नावं आघाडीवर, पाहा कुणाला देणार शिंदे बढती! )
संघाचे संस्कार आणि भाजपबद्दल कृतज्ञता
आपल्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा असल्याचे जोशी यांनी अभिमानाने सांगितले. भाजपमध्येच एका सामान्य कार्यकर्त्याला देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते, असे सांगताना त्यांनी पक्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जर मी राजकारणात कायम राहिलो तर मला संधी नक्कीच मिळत राहतील, पण माझ्या उपस्थितीमुळे एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, हीच माझी प्रामाणिक भावना असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. 55 वर्षांच्या संदीप जोशी यांच्या या निर्णयामुळे नागपूर भाजपमध्ये मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत.
वाचा संदीप जोशी यांचे इमोशनल पत्र (Sandeep Joshi BJP Nagpur Retirement Letter )
... आता मला थांबायचंय !
नमस्कार,
हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे… आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे.
मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व मा. ना. नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे.
माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत, अर्थात आमदारकी, १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन. एखाद्या सामान्य, तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती द्यावी. 13 मे नंतर मी संपूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही, तर सखोल विचारांती घेतलेला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन.
राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतो.
राजकारण हे माझ्या आयुष्यातील एक निमित्त होते. या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या निभावण्याची संधी मिळाली. हे कार्य मात्र पुढेही अविरत सुरू राहील.
कोरोनाच्या काळात एकल पालकत्त्व नशिबी आलेल्या बहिणींसाठीचा ‘सोबत पालकत्व प्रकल्प', नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीचा ‘दीनदयाल थाळी प्रकल्प', मोहगाव झिल्पी येथील गोसेवा प्रकल्प, श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे सामाजिक प्रकल्प, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य ॲम्युचर हॉकी संघटना, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना, नागपूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन, खासदार क्रीडा महोत्सव या क्रीडा क्षेत्रातील विविध पदांना न्याय देईन, तरुण खेळाडूंसोबत उभा राहून त्यांना प्रोत्साहन देईन.
काळ कोणासाठी थांबत नसतो. तो पुढे जातच राहतो. मात्र त्या काळातील काही क्षण आपल्याला आतून हादरवतात. त्या क्षणी घेतलेला निर्णय आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो. इतरांना नाही, किमान स्वतःला न्याय देता आला, तरच जगणे अर्थपूर्ण ठरते, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि तोच निर्णय आज मी घेतला आहे.
कुटुंबानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावर संस्कार केले. मला घडवले. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकत राजकारणात अनेक संधी दिल्या. या सामान्य कार्यकर्त्याला चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषदेचे सदस्य अशी जबाबदारी देत सन्मान दिला. याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि शीर्षस्थ नेतृत्वाचा कायम ऋणी राहीन.
राजकारणात राहिलो तर पुढेही संधी मिळतील, याची मला खात्री आहे. कारण एक सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनू शकतो, हे केवळ भाजपमध्ये शक्य आहे, हे मी अभिमानाने सांगतो. मात्र माझ्या असण्यामुळे कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत आहे. आणि नसण्यामुळे कोणाचे काहीही अडणार नाही, हे अंतिम सत्य आहे. म्हणूनच अधिक काही न बोलता, आज मी हा निर्णय घेत आहे.
शेवटी एवढेच…
कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ,
शोर नहीं, सुकून चुनने चला हूँ।
किसी और की राह रोशन हो सके,
_इसलिए ख़ुद एक क़दम पीछे हटा हूँ।_
आता मी थांबतोय...!
धन्यवाद मित्रांनो…!
आपलाच,
आ. संदीप जोशी
सदस्य, विधान परिषद (महाराष्ट्र)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world