मुंबई: मतदानाच्या एक दिवस आधी नालासोपाऱ्यामध्ये जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला होता. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला. नालासोपाऱ्याच्या विवांता हॉटेलमध्ये तावडे यांना जवळपास 6 तास डांबून ठेवण्यात आलं. बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते जबरदस्त आक्रमक झाले होते. यावेळी काही कार्यकर्त्यांना मारहाणही करण्यात आली होती. तावडे यांच्याकडे एक बॅग सापडली असा आरोप बविआच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केला होता.
त्यांच्याकडे एक डायरी सापडली होती ज्यात काही नावे आणि त्यासमोर रकमा लिहिल्या होत्या असाही आरोप करण्यात आला होता. बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर देखील घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनीही समोरच्या एक दोन कार्यकर्त्यांचे कान गरम करत आपला राग काढला होता. याच हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांना भाजप उमेदवारांनी दणका दिला आहे.
वसईमध्ये हितेंद्र ठाकूर यांचा मुकाबला भाजपच्या स्नेहा दुबे यांच्याशी होता. स्नेहा दुबे या हितेंद्र ठाकूर यांच्या वर्चस्वाला 30 वर्षांपासून आव्हान देणाऱ्या श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडीत यांच्या कन्या आहेत. त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून त्या जायंट किलर ठरल्या आहेत. वसईला लागून असलेल्या नालासोपाऱ्यामध्ये घडलेल्या घटनांचा वसईच्या मतदारांवर काहीही परिणाम झाल्याचे दिसले नाही. ज्या नालासोपारामध्ये नाट्य रंगले होते त्याच मतदारसंघात क्षितीज ठाकूर यांचा पराभव झाला आहे. विनोद तावडे ज्या उमेदवाराने बोलावल्याने चहापानासाठी नालासोपाऱ्यात आले होते त्याच उमेदवाराने म्हणजेच राजन नाईक यांनी क्षितीज यांचा पराभव केला आहे.
कोण आहेत राजन नाईक?
राजन नाईक नालासोपारा पश्चिम येथील रहिवासी असून त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1963 सालचा आहे. बी. कॉम पदवीधर असलेल्या नाईक यांचा ट्रान्सपोर्ट आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. संघ स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले असून ते भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट होती, त्या लाटेतही क्षितीज ठाकूर यांनी विजय मिळवला होता. 2014 साली क्षितीज यांनी राजन यांचा पराभव केला होता. त्या पराभवाचा नाईक यांनी या निवडणुकीत वचपा काढला.
महत्वाची बातमी: काँग्रेसच्या दिग्गजांचे एक-एक गड कोसळले, लोकसभेत हिरो विधानसभेत झिरो!