सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है,' अशा शब्दांत पिंपरी-चिंचवडमधील भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. राष्ट्रवादीच्या २० हून अधिक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आता लवकरच दुसरी मोठी ‘भरती' होणार असल्याचा इशारा भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी दिला आहे.
यामुळे शहरातील राजकीय संघर्ष ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतील माजी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांसह अनेक मातब्बर पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या धक्क्यातून राष्ट्रवादी सावरत असतानाच शंकर जगताप यांनी अजित पवार यांना खुले आव्हान देत आगामी काळात आणखी नगरसेवक भाजपमध्ये येतील, असे संकेत दिले आहेत.
एकीकडे भाजप आक्रमकपणे इतर पक्षांतील नेत्यांना प्रवेश देत असली तरी यामुळे पक्षात अंतर्गत अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपकडे स्वतःचे तुल्यबळ उमेदवार असताना इतर पक्षांतील नेत्यांसाठी पायघड्या का घातल्या जात आहेत ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर भाजपच्या स्थानिक नेत्यांची काहीशी कोंडी होताना दिसत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी मिळाल्यास निवडणुकीत त्याचे काय पडसाद उमटतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.