मंगेश जोशी, प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) अमळनेर मतदारसंघात भाजपच्या माजी आमदाराकडून भाजपच्या महिला खासदारांना धमकवलं जात असल्याच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे . खासदार स्मिता वाघ या युती धर्म पाळत अमळनेर मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा प्रचार करत आहेत. दरम्यान त्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप स्मिता वाघ यांनी जाहीर सभेत केला आहे. निवडणुकांपूर्वीच धमक्यांच्या राजकारणामुळे मात्र अमळनेर मध्ये राष्ट्रीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अमळनेर मतदारसंघात भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनी हा दावा केला आहे. भाजपच्या माजी व सद्यस्थितीत महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी दिली जात आहे, असा आरोप खासदार स्मिता वाघ यांनी केला आहे. स्मिता वाघ यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. आपल्याला जरी धमकावलं जात असलं तरी आपण मेलेल्या आईचे दूध प्यायलेलं नसून धमक्या द्यायच्या असतील तर समोर येऊन धमक्या द्या असं थेट आव्हान खासदार स्मिता वाघ यांनी दिलं आहे.
खासदार स्मिता वाघ यांनी नाव न घेता जरी हे आरोप केले असले तरी त्यांचा रोख हा भाजपचे माजी आमदार व सद्यस्थितीत अपक्ष उमेदवार असलेले शिरीष चौधरी यांच्याकडे आहे. मात्र बहिणींना धमकी देणे हे आमच्या रक्तात नसून स्मिता वाघ यांनी आपल्या मुलाची शपथ घेऊन आम्ही धमकी दिल्याचे सांगितल्यास आजच निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊ असं थेट प्रती आव्हान भाजपचे माजी आमदार व पक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी खासदार स्मिता वाघ यांना दिले आहे.
नक्की वाचा - मराठमोळे आमदार अतुल बेनकेंनी अचानक पगडी घालण्यास का केली सुरुवात?
अमळनेरमध्ये नेमकं काय घडतंय?
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून अनिल पाटील हे उमेदवार होते, तर शिरीष चौधरी हे अपक्ष रिंगणात होते. त्यावेळी शिरीष चौधरी यांनी भाजपाचे उमेदवार अनिल पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला. मात्र या विजयानंतर शिरीष चौधरी यांनी भाजपला पाठिंबा दिला. 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून शिरीष चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली व अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीकडून अनिल पाटील हे उमेदवार होते. या निवडणुकीत अनिल पाटील यांनी भाजपचे उमेदवार शिरीष चौधरी यांचा 8 हजार 594 मतांनी पराभव करत विजय मिळवला. तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनिल पाटील यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अनिल पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली.
महायुतीत अनिल पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली असून भाजपाकडून इच्छुक असलेले शिरीष चौधरी यांनी पुन्हा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. येथूनच अनिल पाटील व शिरीष चौधरी हे पुन्हा आमने सामने आले. महाविकास आघाडीत अमळनेरची जागा काँग्रेसकडे गेली असून काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे येथील महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. महायुतीचा धर्म पाळण्यासाठी भाजपच्या खासदार स्मिता वाघ या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अनिल पाटील यांचा प्रचार करत आहेत. युतीधर्म पाळत असल्यानेच आपल्याला धमकवल्या जात असल्याचा आरोप स्मिता वाघ यांनी केला आहे. त्यामुळे अशा धमक्यांना आम्ही घाबरणारे नसून गेल्या 35 वर्षांपासून सामाजिक व राजकीय जीवनात काम करतोय. अशा धमक्या अनेकदा आम्ही पाहिल्या असून पोकळ धमक्यांना आम्ही घाबरणार नसल्याचं म्हटलं आहे.
नक्की वाचा - 'जाती जातीत भांडणे लावण्याचा खतरनाक खेळ...', PM मोदींचे काँग्रेस, 'मविआ'वर टीकास्त्र
महायुतीमध्ये सक्रिय काम करणाऱ्या खासदारांसह कार्यकर्त्यांना देखील धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. खासदार स्मिता वाघ या अमळनेरकरांचा स्वाभिमान आहे त्यामुळे 23 तारखेनंतर आम्ही हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मंत्री अनिल पाटील यांनी दिला आहे. तर यापुढे कार्यकर्त्यांना धमक्या आल्यास त्यांची रितसर पोलिसात तक्रार करू आणि पोलिसात तक्रार करून देखील धमक्यांचे प्रकार सुरू राहिल्यास धमक्या देणाऱ्यांना महाप्रसाद देण्याचा थेट इशारा अनिल पाटलांनी दिला आहे. अमळनेर मतदारसंघात खासदार स्मिता वाघ यांनी केलेल्या धमक्यांच्या आरोपावरून निवडणुकांपूर्वीच मोठी खळबळ उडाली असून महायुतीचा धर्म पाळल्यामुळे स्मिता वाघ या अडचणीत येत आहेत का? या धमक्यांच्या राजकारणाचा नेमका कुणाला फटका बसणार व याबाबत महायुतीतील नेते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world