नागिनंद मोरे, धुळे: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेचा प्रचार सध्या रंगात आला असून आज राज्यात मोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ धुळ्यामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला बहुमत देऊन पुन्हा राज्यात सत्ता आणा असे आवाहन केले. तसेच लाडकी बहीण योजना, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मात्र याला काँग्रेससह महाविकास आघाडीमधील घटकपक्षांचा विरोध आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
"धुळ्यातील सर्वांना रामराम.. धुळ्याची ही धरती आणि महाराष्ट्रासोबतचे माझे नाते तुम्हा सर्वांना माहित आहे. महाराष्ट्राला मी जे मागितले ते महाराष्ट्रातील लोकांनी दिले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मी धुळ्यात आलो होतो. मी तुमच्याकडे भाजप सरकारसाठी आग्रह केला होता. तुम्ही महाराष्ट्रात १५ वर्षाची सत्ता मोडून भाजपला सत्ता दिली. आज पुन्हा मी धुळ्यात आलो आहे. धुळ्यातूनच मी महाराष्ट्राच्या प्रचाराचा शुभारंभ करत आहे. तुमचे प्रेम, अफाट जनसमर्दन, जनसमुह हा उत्साह खरोखर उत्साह वाढवतो. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. तुम्हाला मी विश्वास देतो. मागील २ वर्षात महाराष्ट्राच्या विकासाला जी गती मिळाली आहे ती थांबणार नाही. महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेऊन ठेऊ," असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
मविआवर टीकास्त्र!
"दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गाडीत ना चाके आहेत ना ब्रेक आहे आणि ड्रायव्हरच्या सीटसाठी ही भांडणं सुरु आहेत. चारी बाजूंनी भांडणाचे सुर ऐकू येत आहेत. राजकारणात आल्यानंतर प्रत्येकाचे एक ध्येय असते. आमच्यासारखी लोक जनतेला देव समजतात तर काही जण लोकांना लुटण्याचे राजकारण करतात. अशी लोक विकास ठप्प करतात, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात. तुम्ही महाविकास आघाडीचे कुरघोडी करुन बनलेले सरकार पाहिले आहे. त्यांनी आधी सरकार लुटले आणि तुम्हालाही लुटण्यास सुरुवात केली होती. त्यांनी प्रत्येक योजनेत थांबवण्याचे काम केले ज्यामुळे महाराष्ट्राचे भले होणार होते," असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.
'महायुती म्हणजे विकासाचा रोडमॅप..'
"राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर हे चित्र बदलून गेले. महाराष्ट्राने विकासाचे नवे रेकॉर्ड तयार केले. माझा महाराष्ट्रातील सर्वांना आग्रह आहे, भाजप महायुती आहे तर आहे गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. मी महायुतीला खूप खूप शुभेच्छा देतो. महायुतीने नवा वचननामा जारी केला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जनतेच्या सल्ल्याने शानदार वचननामा तयार केला आहे. महायुतीचा वचननामा म्हणजे विकासाची वाढेल गती, महाराष्ट्राची होणार हमखास प्रगती. महायुतीचा वचननामा म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आहे," असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
काँग्रेसवर गंभीर आरोप
"महायुती सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेची देशात चर्चा आहे. मात्र काँग्रेस ही योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सत्ता मिळाल्यास ही योजना बंद करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांनी महाविकास आघाडीपासून सतर्क राहावे लागेल. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक महिलांना शिव्या देत आहेत.महाराष्ट्रातील महिला हे कधीही सहन करणार नाही. मला अभिमान आहे की आमच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या निर्णयानंतर जगभरातील मराठी भाषिकांचे संदेश येत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अनेक दशकांपासूनची इच्छा होती. काँग्रेसने महाराष्ट्रात, केंद्रात राज्य केले. मात्र मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी त्यांना गरज वाटली नाही. त्यांनी नेहमी या मागणीकडे दुर्लक्ष केले. आता हे काम मोदींनी कसे आणि का केले? असेच त्यांना वाटते. हाच महाविकास आघाडीचा खरा चेहरा आहे, असा घणाघातही पंतप्रधान मोदींनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world