राहुल तपासे, प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच आपल्या मनाप्रमाणे वागणारे भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करणाऱ्या उमेदवाराची उदयनराजेंनी मध्यरात्री गळाभेट घेतली. ही भेट केवळ साधी भेट नव्हती, तर आपल्या पक्षाच्या उमेदवाराला हरवणाऱ्या व्यक्तीला मिठी मारताना उदयनराजेंना चक्क आनंदाश्रू अनावर झाले. भाजप खासदार असूनही त्यांनी आपल्या पक्षाच्या पराभवापेक्षा मित्राच्या विजयाला दिलेले हे महत्त्व आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे.
नेमकं काय घडलं?
कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अशी लढत झाली होती. या चुरशीच्या लढाईत भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला आणि शिवसेनेचे राजेंद्रसिंह यादव यांनी विजय मिळवला. वास्तविक पाहता, उदयनराजे भाजपचे खासदार असल्याने त्यांनी आपल्या पक्षाच्या पराभवावर चिंतन करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी राजकीय प्रोटोकॉल बाजूला सारून थेट विजयी उमेदवाराचे घर गाठले.

राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे बंधू विजय यादव हे उदयनराजेंचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. याच मैत्रीखातर उदयनराजे निवडणुकीच्या प्रचारापासूनही दूर राहिले होते, पण निकालानंतर मात्र त्यांनी थेट मैदानात उतरून मित्राचा विजय साजरा केला.
( नक्की वाचा : BMC Election 2026 : मुंबईच्या सत्तेसाठी भाजपाची 'फिल्डिंग'; 137 उमेदवार रिंगणात, वाचा तुमचा उमेदवार कोण? )
मध्यरात्रीची गळाभेट आणि डोळ्यांत आनंदाश्रू
विजयाची बातमी समजताच उदयनराजे मध्यरात्री कराडमध्ये दाखल झाले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची भेट घेतल्यावर उदयनराजे कमालीचे भावूक झाले होते. त्यांनी यादव यांना घट्ट गळाभेट दिली आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे प्रेम देताना पाहून उपस्थित सर्वच जण अवाक झाले. राजकीय विचारधारेपेक्षा आपल्यासाठी मित्र मोठा आहे, हेच उदयनराजेंनी या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध करून दिले.
आता पार्टी तर पाहिजेच ...
या भेटीदरम्यान उदयनराजेंनी आपल्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत संवादही साधला. आता नगराध्यक्ष झाला आहेस, तर पार्टी तर पाहिजेच, असे म्हणत त्यांनी गप्पांची मैफल रंगवली. भाजपचे खासदार असूनही पक्षाच्या पराभवाचे दुःख न मानता, पराभव करणाऱ्या मित्राच्या गळ्यात गळा घालून आनंद व्यक्त केल्याने भाजपच्या स्थानिक गोटात मात्र अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. सातारा आणि कराडच्या राजकारणात पक्षादेशापेक्षा 'महाराजांची मैत्री' जास्त प्रभावी ठरते, हेच या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world