नागिंद मोरे, धुळे
Dhule Nagar Parishad Election Result: धुळे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत भाजपक्षाने धडाकेबाज कामगिरी करत नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवला आहे. भाजपच्या उमेदवार डॉ. योगिता चौरे यांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवला असून, शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांच्या नेतृत्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
अत्यंत चुरशीची लढत
पिंपळनेर नगर परिषदेसाठी झालेल्या या मतदानात सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. नगराध्यक्ष पदासाठी डॉ. योगिता चौरे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांच्यात थेट लढत होती. अखेर डॉ. चौरे यांनी बाजी मारत पिंपळनेरच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा होण्याचा मान मिळवला आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीचे निकाल पाहता, पिंपळनेरमध्ये मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचे स्पष्ट होत आहे.
(नक्की वाचा- Jalgaon News: चाळीसगावात मतमोजणीआधीच लागला 'निकाल', भाजपच्या प्रतिभा चव्हाणांच्या बॅनर्सनी राजकारण तापलं)
पिंपळनेर नगर परिषदेचा निकाल
- भाजप- 08 नगरसेवक
- शिवसेना - (शिंदे गट) - 08 नगरसेवक
- अपक्ष - 02
या निकालानुसार, भाजप आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांना प्रत्येकी 8 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कोणाचेही स्पष्ट बहुमत नसले तरी, नगराध्यक्ष पद भाजपने जिंकल्यामुळे सत्तेच्या चाव्या आता भाजपकडे आल्या आहेत. या निवडणुकीत 2 अपक्ष उमेदवारांनीही विजय मिळवला असून, सत्तेच्या समीकरणात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
आमदार मंजुळा गावित यांना मोठा धक्का
पिंपळनेर हा आमदार मंजुळा गावित यांचा बालेकिल्ला समजला जातो. आपल्या मतदारसंघात नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी मोठी मोहीम राबवली होती. मात्र, मतदारांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या डॉ. योगिता चौरे यांना पसंती दिली, ज्यामुळे गावित यांच्या राजकीय प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.