BMC Election Seat Sharing Formula: गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेला मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा पेच अखेर सुटला आहे. महायुतीमधील जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पक्ष १३७ जागांवर तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे.
भाजप- शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला...!
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु होती. अनेक बैठका झाल्यानंतरही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने युती होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. अशातच महायुतीची जागा वाटपाचा पेच सुटला असल्याचे समोर आले आहे.
भाजपचे मुंबई निवडणूक प्रमुख अमित साटम यांनी मंगळवारी अधिकृतपणे ही घोषणा केली. उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ एक दिवस शिल्लक असताना हा तिढा सुटल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. भारतीय जनता पक्ष १३७ जागांवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे.
या जागावाटपात भाजपने आपला वरचष्मा कायम राखला असून, मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे, महायुतीमधील इतर मित्र पक्षांना शिवसेनेच्या ९० जागांच्या कोट्यातूनच जागा दिल्या जाणार आहेत. "आमची चर्चा पूर्ण झाली असून २२७ जागांचे गणित मांडण्यात आले आहे. भाजप १३७ आणि शिवसेना ९० जागा लढवेल," असे साटम यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातही जागा वाटप ठरले...
दुसरीकडे ठाण्यातही महायुतीचे जागा वाटप ठरले आहे. ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीमधील युतीचा तिढा अखेर सुटला आहे. 131 जागांपैकी शिवसेनेला 87 जागा तर मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला 40 जागा देण्यात आल्या आहेत. तर मुंब्रा विकास आघाडीला 4 जागा सोडण्यात आल्या आहेत. ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी सेनेच्या अधिकृत उमेदवारांना अर्जाचे वाटप करण्यात आले. तर भाजपच्या वतीने वर्तकनगर येथील कार्यालयात अर्जाचे वाटप करण्यात आले. आज सकाळी पासून उमेदवार अर्ज भरण्यास सुरुवात करणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world