BMC Housing Lottery: BMC कडून 426 घरांसाठी लॉटरी, अर्जापासून सोडतीच्या तारखेसंदर्भातील सगळी माहिती जाणून घ्या

BMC Housing Lottery 2025: मुंबई महापालिकेने उपलब्ध करून दिलेली घरे ही अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध असतील

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईतील नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-2034 च्या विनियम 15 व 33 (20) (ब) अंतर्गत पालिकेला प्राप्त झालेल्या एकूण 426 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही प्रक्रिया दिनांक 16 ऑक्टोबर 2025 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

नक्की वाचा: 10 रुपयांचा शेअर थेट 9 हजारांवर! 'क्रिकेटचा देव'च ठरला शेअरमागचा 'खेळाडू'? कंपनीनं मौन सोडलं

मुंबई महापालिकेच्या घरांसाठी अर्ज कुठे करायचा ?

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही पारदर्शक सोडत प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. या सदनिका अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध असतील, ज्यामुळे मुंबईतील सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. सदनिका विक्रीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज मागविण्यात येत आहेत.

BMC च्या घरांसाठीच्या लॉटरीची सोडत कधी आहे?  

  1. अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून ऑनलाइन सुरू होईल.
  2. अर्जदारांना दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरता येतील.
  3. अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल.
  4. पात्र अर्जदारांची अंतिम यादी दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल
  5. सोडत प्रक्रिया दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडेल.
  6. या सोडतीतून निवड झालेल्या यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

BMCच्या घरांबद्दलच्या डिटेल्स कधी कळणार ? 

या प्रक्रियेसंदर्भातील माहिती पुस्तिका 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रकारची माहिती तसेच अटी व शर्ती माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे. या प्रक्रियेतील सदनिकांसंदर्भात आवश्यक बदल करण्याचा अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे आहेत, तसेच माहिती पुस्तिकेतील सर्व अटी व शर्ती लागू राहतील, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

नक्की वाचा: मेट्रो 3 च्या स्टेशनवर मोफत Wi-Fi वापरायचंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा कनेक्ट

BMC च्या घरांसाठीच्या लॉटरीसाठी हेल्पलाईन नंबरही प्रसिद्ध झाला

कोणत्याही मदतीसाठी अर्जदार 022-22754553 या मदतसेवा क्रमांकावर किंवा bmchomes@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. अथवा, 'सहाय्यक आयुक्त मालमत्ता, चौथा मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – 400 001' या पत्त्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article