जाहिरात
Story ProgressBack

मुंबई महापालिकेला आली जाग, मध्य-पश्चिम रेल्वेला नियमबाह्य होर्डिंगप्रकरणी बजावली नोटीस

घाटकोपर दुर्घटनेनंतर या ठिकाणी महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अन्य तीन जाहिरात फलक काढण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे.

Read Time: 3 min
मुंबई महापालिकेला आली जाग, मध्य-पश्चिम रेल्वेला नियमबाह्य होर्डिंगप्रकरणी बजावली नोटीस

Mumbai Illegal Hoardings:  घाटकोपरमधील छेडानगर परिसरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून दुर्घटना घडली. या ठिकाणी महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अन्य तीन जाहिरात फलक काढण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे. वाऱ्याच्या वेगामुळे या कारवाईत बाधा येत आहे. असे असले तरी दोन जाहिरात फलक बुधवारी (15 मे 2024) रात्रीपर्यंत तर एक जाहिरात फलक गुरुवारपर्यंत (16 मे 2024) काढण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाने कळवले आहे. 

(नक्की वाचा: घाटकोपर होर्डिंग प्रकरणात आणखी दोघांचा बळी; मृतांची संख्या चिंता वाढवणारी)

मुंबई मनपाने बजावली नोटीस

दरम्‍यान मध्‍य रेल्‍वे आणि पश्चिम रेल्‍वेच्या हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्‍हणजे 40 फूट बाय 40 फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक रेल्‍वे प्रशासनाने तातडीने हटवावेत, या आशयाची नोटीस बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 अंतर्गत कलम 30 (२) (व्‍ही) अन्‍वये, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बजावली आहे.

घाटकोपरमधील छेडानगर परिसरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी (14 मे 2024) भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेत बृहन्मुंबई कार्यक्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग तत्काळ काढण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. छेडानगर परिसरात आणखी तीन जाहिरात फलक विनापरवाना उभारण्यात आल्याचे आढळून आले होते. तीनही जाहिरात फलकांवर कारवाई सुरू करण्यात आली होती. वाऱ्याचा वेग, वाहतूक व्यवस्थापन, उपलब्ध मनुष्यबळ यांची सांगड घालून ही कारवाई केली जात असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. 

(नक्की वाचा - घाटकोपरमध्ये घडलेल्या या 5 घटनांनी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला)

दुर्घटनास्थळी सुरू असलेल्या कार्यात अडथळा न आणता हे तीन होर्डिंग काढण्याची कारवाई केली जात आहे.  होर्डिंग्जचे लोखंडी सांगाडे सुटे करण्याचे आणि ते खाली उतरवण्याचे काम अविरत सुरू आहे. बुधवारी (15 मे 2024) रात्रीपर्यंत दोन तर एक जाहिरात फलक काढण्यात येतील.  सुटे झालेले भाग आणि मलबा तत्काळ वाहून नेण्यात येणार आहे. 

मध्‍य रेल्‍वे आणि पश्चिम रेल्‍वे प्रशासनाला नोटीस

घाटकोपर येथील दुर्घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मध्‍य रेल्‍वे आणि पश्चिम रेल्‍वे प्रशासनाला आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 अंतर्गत कलम 30 (2) (व्‍ही) अन्‍वये नोटीस बजावली आहे. मुंबई जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण या नात्‍याने महानगरपालिकेने मध्‍य आणि पश्चिम रेल्‍वेचे विभागीय अभियंतांना ही नोटीस पाठवली आहे. रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीत नियमबाह्य आकाराचे म्‍हणजे 40 फूट बाय 40 फूट पेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक असल्‍यास ते तातडीने काढण्‍याचे निर्देश या नोटीसीद्वारे देण्‍यात आले आहेत. मुंबईची भौगोलिक स्थिती तसेच समुद्र किनाऱ्याला लागून असलेला प्रदेश लक्षात घेता पर्यायाने हवामान व वाऱ्याची स्थिती पाहता 40 फूट बाय 40 फूट पेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्‍यास महानगरपालिका प्रशासन परवानगी देत नाही.

(नक्की वाचा: होर्डिंग दुर्घटनेवरून राजकारण तापलं; सत्ताधारी-विरोधकांचे आरोप प्रत्यारोप)

असे असताना रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीत महानगरपालिका रस्‍ते / खासगी जागा बांधकामे यांच्‍या लगतच्‍या ठिकाणी नियमबाह्य आकाराचे जाहिरात फलक उभारल्‍याचे आढळून आले आहे. हे पाहता घाटकोपरमध्‍ये घडलेल्‍या दुर्घटनेसारखा प्रसंग पुन्‍हा ओढावू नये, यासाठी रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीतील 40 फूट बाय 40 फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक तातडीने काढण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. 

मालाड (पश्चिम) येथील एम. एम. मिठाईवाला दुकानावरील अनधिकृत फलक काढला

मालाड (पश्चिम) येथील एम. एम. मिठाईवाला या दुकानावर 15 x 10 आकाराचा चहूबाजूने उभारलेला अनधिकृत जाहिरात फलक मंगळवारी (14 मे 2024) काढण्यात आला. पी उत्तर विभागाने ही कारवाई केली आहे.

VIDEO: घाटकोपरची पुनरावृत्ती कल्याणमध्ये होणार?, शिवसेना शहरप्रमुखाचे गंभीर आरोप 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination