मुंबईतील घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. अवाढव्य अशा या होर्डिगच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. यासाठी बचावकार्य अद्यापही सुरु आहे. एकीकडे प्रशासनाकडून बचावकार्य सुरु असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये या घटनेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईतील होर्डिंग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण
मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डिंग माफियांना भाजपा-शिंदे-अजित पवार सरकारचे संरक्षण आहे. मुंबई महानगर पालिका, राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचे आशीर्वाद असल्याशिवाय असे अनधिकृत होर्डिंग लावले जावू शकत नाहीत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारमुळे मुंबईची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, कमशिनच्या हव्यासातून मुंबई शहर बकाल केले आहे. घाटकोपरमधील होर्डिंग हे एक उदाहरण आहे, अशी हजारो होर्डिंग अनधिकृत रितीने शहरभर झळकत आहेत, असंही पटोले यांनी म्हटलं.
नक्की वाचा- काळ आला होता पण वेळ आली नव्हती! 'त्यांनी' सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
राम कदम यांचा ठाकरे गटावर आरोप
भाजप आमदार राम कदम यांनी देखील ट्वीट करत, शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे उद्धव ठाकरे यांच्या घरात दिसत आहे. मनाला चीड आणणारे हे चित्र आहे. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते, हे या चित्रावरून स्पष्ट होते, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. आजही टक्केवारीसाठी 14 लोकांचे नाहक बळी घेत आहेत, कुठे फेडणार हे पाप?, असं ट्वीट राम कदम यांनी केलं आहे.
14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात..
— Ram Kadam ( modi ka parivar ) (@ramkadam) May 14, 2024
मनाला चीड आणणारे हे चित्र..
त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते
हे या चित्रावरून स्पष्ट होते..
टक्केवारी साठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर..
आजही टक्केवारी साठी 14… pic.twitter.com/5OGtWxh2Pp
महाविकास आघाडीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. दोन्ही नेत्यांनी या दुर्घटनेवरुन एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल केला. होर्डिंग दुर्घटनेतील 14 मृतांना श्रद्धांजली म्हणून महाविकास आघाडीने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक सभा आणि कार्यक्रम एक दिवसासाठी रद्द केले. मात्र भाजपने आपले कार्यक्रम सुरुच ठेवल्याने विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
नक्की वाचा - रिक्षाचा चुराडा, मोबाइल सापडला, पण 12 तासानंतरही 'तो' बेपत्ता
मनसे नेते मनोज चव्हाण यांनी देखील आरोप करत गेली दीड वर्ष आपण हे होर्डिंग अनाधिकृत असल्याचं सांगत आहोत. याशिवाय या जागेत उभारलेला पेट्रोल पंपसुद्धा अनाधिकृत आहे. आपण सातत्याने पाठपुरावा करून देखील कुणीही दाद दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
इगो कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल
पंतनगर पोलिसांनी इगो मीडिया या होर्डिंग ऑपरेटिंग कंपनीचे संचालक भावेश भिंडे, कंपनीचे इतर संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि इतरांविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 304, 337, 338 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
(नक्की वाचा - होर्डिंगच्या मालकामुळे 14 जणांचे हकनाक बळी; नववी फेल असलेला भावेश भिंडे कोण आहे? )
सरकारकडून मदत जाहीर
सोमवारी झालेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही तासातच घटनास्थळी धाव घेतली. जखमींची भेट घेऊन नातेवाईकांना धीर दिला. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. तसेच जखमींच्या उपचारासाठीचा सर्व खर्च शासनाकडून केला जाईल, अशी घोषणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world