अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana News : गॅस टंचाईमुळे राज्यभरातील हॉटेलांवर संकट कोसळलं असताना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट गाव मात्र अपवाद ठरलं आहे. या गावातील चहाचं हॉटेल गेल्या २० ते २५ वर्षांपासून केवळ कोळशाच्या भट्टीवर चालत आहेत. गॅसचा थोडाही वापर न करता ही हॉटेलं अविरत सुरू आहेत. जिल्ह्यातील हे एकमेव कोळशाच्या भट्टीवर चालणारं गाव म्हणून ओळखलं जातं. जिथे संपूर्ण हॉटेल व्यवसाय पारंपरिक कोळसा भट्टीवर अवलंबून आहे.
देऊळघाट गावात चहाच्या हॉटेलांची रेलचेल आहे. सकाळी लवकरच कोळशाच्या भट्ट्या पेटवल्या जातात आणि दिवसभर चहा, नाश्ता तयार होतो. गॅस टंचाईमुळे इतरत्र हॉटेलं बंद पडत असताना इथे व्यवसाय सुरळीत चालू आहे. हॉटेल मालक पाटील सांगतात, 'गॅसवर अवलंबून नसल्यामुळे आम्हाला कधीच त्रास होत नाही. कोळसा नेहमी मिळतो आणि खर्चही कमी आहे.' तर दुसऱ्या हॉटेल मालकाने सांगितलं की, 'आमच्या आई-बाबांनी सुरू केलेली ही पद्धत आजही चालू आहे. गॅस बंद झाल्यावरही आम्ही उपाशी राहणार नाही.'
गॅस पुरवठा पूर्ववत झाला तरी इथे कोळशाची भट्टी पेटत राहणारच
गावातील हे छोटे दुकानदार पारंपारिक पद्धतीने व्यवसाय चालवतात. गॅस संकटाने आधुनिक राहणीमानावर प्रश्नचिन्ह उभा राहिला असताना देऊळघाट एक आदर्शवत उदाहरण म्हणून समोर आलं आहे. हा पारंपारिक उपाय किती महत्त्वाचा आहे हे आताच्या कठीण काळात लक्षात येतं. व्यवसायात थोडी घट झाली तरी उपजीविका चालू ठेवण्यासाठी कोळसा भट्टीच पर्याय ठरला आहे. एकंदरीत, आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीची सांगड घालून संकटातून मार्ग काढणं आवश्यक असल्याचं या गावातून दिसतंय. गॅस पुरवठा पूर्ववत झाला तरी इथे कोळशाची भट्टी पेटत राहणारच हे नक्की!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world