अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana Accident: बुलडाणा जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. सोमवारी (5 जानेवारी 2026) पुन्हा एकदा एका भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला. या अपघातामध्ये 3 तरुणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. वेगाची ओढ आणि नियमांकडे केलेले दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याचाच प्रत्यय या घटनेतून आला आहे. एका सुसाट दुचाकी आणि शिवशाही बसमध्ये झालेल्या या धडकेने परिसरात खळबळ उडाली आहे.
कसा झाला अपघात?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर आगाराची शिवशाही बस क्रमांक MH 06 BW 3638 ही छत्रपती संभाजीनगरकडून मलकापूरकडे जात होती. याच वेळी ढालसावंगी येथील अंकुश पाडळे, रवी चंदनशे आणि कैलास शिंदे हे तिघे मित्र एकाच दुचाकीवर स्वार होऊन धाडकडून करडीच्या दिशेने येत होते.
करडी येथील पुलावर ही बस आणि दुचाकी समोरासमोर आल्या आणि त्यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुरा झाला आणि ती बसच्या खाली घुसली.
( नक्की वाचा : Beed News : Facebook Live वर मृत्यूचा थरार! बायको फॉलोअर्सशी बोलत होती अन् सर्वांसमोर झाला नवऱ्याचा मृत्यू )
अंगावर काटा आणणारा अपघात
हा अपघात केवळ भीषण नव्हता तर तो अंगावर काटा आणणारा होता. धडक बसताच तिन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात एका तरुणाच्या डोक्याला इतकी गंभीर इजा झाली की त्याच्या डोक्याची कवटी फुटून मेंदू बाहेर आला होता. शरीराच्या अवयवांचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्यामुळे घटनास्थळावरील दृश्य पाहून पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याने मदतीची संधीही उरली नव्हती.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी करडी पुलावर मोठी गर्दी केली. ढालसावंगी गावातील तीन तरुण या अपघातात मृत्युमुखी पडल्याची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. एकाच गावातील तीन उमद्या तरुणांचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world