जाहिरात

Buldhana News: धक्कादायक! लग्नासाठी मुलगी मिळेना; दोन तरुणांनी मृत्यूला कवटाळलं

Buldhana News: बुलडाणा जिल्ह्यात लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या नैराश्यातून पाच दिवसांत दोन तरुणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Buldhana News: धक्कादायक! लग्नासाठी मुलगी मिळेना; दोन तरुणांनी मृत्यूला कवटाळलं

अमोल सराफ, बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यात लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या नैराश्यातून पाच दिवसांत दोन तरुणांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. संग्रामपूर तालुक्यातील हरीश वानखेडे आणि चिखली तालुक्यातील सत्यपाल भिसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गरिबी, बेरोजगारी आणि व्यसनाधीनता यामुळे या तरुणांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

पहिली घटना 

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील 28 वर्षीय हरीश वानखेडे याने राहत्या घरात गळफास घेतला. हरीश अत्यंत गरीब कुटुंबातील होता. त्याचे वडील गेल्या 2-3 वर्षांपासून त्याच्यासाठी मुलगी पाहत होते. हरीश भूमिहीन असल्याने आणि घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. याच नैराश्यातून त्याने घरात कुणीही नसताना जीवन संपवले.

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

दुसरी घटना

दुसरी घटना अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगरूळ येथे घडली. 25 वर्षीय सत्यपाल भिसे याने झाडाला फाशी घेतली. सत्यपालचे शिक्षण भरपूर झाले होते, मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. सोबतच्या मित्रांची लग्ने झाली, मात्र त्याचे लग्न जुळत नव्हते. या दुहेरी नैराश्यातून सत्यपालला दारूचे व्यसन लागले होते. अखेर मानसिक तणाव असह्य झाल्याने त्याने फाशी घेऊन आपले आयुष्य संपवले.

या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी 'आकस्मिक मृत्यू'ची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या घटनांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एक भीषण वास्तव समोर आणले आहे. शेतीतील अनिश्चितता, बेरोजगारी आणि मुलींच्या बदललेल्या अपेक्षांमुळे मुलांची लग्ने न होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यातून तरुण नैराश्याकडे ओढले जात आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com