अमोल सराफ, बुलढाणा:
Buldhana Teacher Murder Case: एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आले आहे.. किरकोळ अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात १ लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणलेला कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जळगाव जामोद पोलिसांनी या गुन्ह्याचा अत्यंत शिताफीने तपास लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अपघातामागचा खुनी खेळ, पत्नीला संपवण्यासाठी कट
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील २ मार्च रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील कवठळ गावाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या 'टाटा इंट्रा' गाडीने शाळेवर जाणाऱ्या शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, मात्र जळगाव जामोद पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि सत्य समोर आले.
Pune Accident: क्षणात सगळं संपलं! भरधाव ट्रकने चिरडलं, तरुणीने जागीच जीव सोडला; भयंकर VIDEO
पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास केला असता तपासादरम्यान संशयाची सुई पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा (एमएच २८ बीबी ५७५३) गाडीकडे वळाली. ही गाडी मनीष सुर्यवंशी (रा. शेगाव) याची असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता मनीषने या थरारक कटाची कबुली दिली आहे.
तीन वेळा वाचली, शेवटचा भयंकर प्लॅन!
मनीषने दिलेल्या कबुली जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य सूत्रधार मृत वृषाली यांचा पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार ( रा. पातुर्डा) यांनी मिळून हा कट रचला असल्याचे सांगितले. तर मृतक वृषाली यांना अन्नातून विष देऊ मारण्याचा तीन वेळा प्रयत्न झाला होता, मात्र तो यशस्वी झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे.
आरोपींनी मनीष सुर्यवंशी याला वृषाली यांना गाडीने उडवण्यासाठी १ लाख रुपयांची सुपारी दिली होती. ठरल्याप्रमाणे २ मार्चच्या सकाळी मनीषने वृषाली यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि मागून कट मारून त्यांना खाली पाडले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गुन्ह्यात वाहन चालक मनीष सुर्यवंशी, मध्यस्थ मंगेश चुलकार आणि पती प्रकाश अनंता गावंडे या तिघांनाही पोलिसांनी आरोपी केले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ६१(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तिघांनाही अटक करून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world