Chhatrapati Sambhajinagar News: निवडणूक कामाचे नियोजन करताना प्रशासकीय यंत्रणेचा किती गोंधळ उडाला आहे, याचा संतापजनक नमुना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. तब्बल ३ महिने आणि १३ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या दोन शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मृत शिक्षकांना नोटीस..
पैठण तालुक्यातील संभाजी कर्डिले यांचे ३ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे, तर दुसरे शिक्षक राजेश बसवे यांचे १३ महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. नियमानुसार, निवडणूक प्रक्रियेपूर्वी कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट करणे आवश्यक असते. मात्र, या दोन्ही मृत शिक्षकांची नावे निवडणूक ड्युटीच्या यादीत तशीच ठेवण्यात आली. धक्कादायक म्हणजे, त्यांना केवळ कामाचे आदेशच दिले नाहीत, तर ते प्रशिक्षणाला उपस्थित न राहिल्याने आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
२४ तासांत खुलाशाचे आदेश
निवडणूक आयुक्तांच्या स्वाक्षरीने मिळालेल्या या पत्रात अत्यंत कडक भाषेत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. "निवडणूक कामात हलगर्जीपणा दाखवल्याबाबतचा खुलासा नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत सादर करावा, अन्यथा शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल," असे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. जे शिक्षक आता या जगातच नाहीत, त्यांनी २४ तासांत खुलासा कुठून आणि कसा द्यावा, असा संतप्त सवाल मृतांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.
शिक्षक सेनेचा तीव्र संताप
या प्रकारानंतर राज्य शिक्षक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. "हा प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस आहे. मृत व्यक्तींना नोटीस बजावून त्यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम प्रशासन करत आहे," अशा शब्दांत शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. माहितीचे संकलन करताना साधी खातरजमा न करताच अशा नोटिसा कशा निघतात, असा प्रश्न उपस्थित करत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
BMC Election 2026: 'पैशासाठी निष्ठा विकली', ठाकरे गटात नाराजीनाट्य, 4 शाखाप्रमुखांचे राजीनामे
यंत्रणेच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह
डिजिटल युगात जिथे सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असते, तिथे प्रशासनाचा असा 'अजब' कारभार समोर आल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. निवडणूक ड्युटीचे नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जुनीच यादी वापरल्याने हा गोंधळ झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणाने निवडणूक विभागाच्या कामकाजातील गांभीर्य ऐरणीवर आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world