Chhatrapati Sambhajinagar Saree Offer: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सणासुदीच्या काळात अनेक दुकानदार स्वस्तात मस्त.. अशा ऑफर ठेवत असतात. अनेकदा अशा आकर्षक ऑफर्समुळे खरेदीदारांची अशी काही झुंबड उडते की दुकानदार मालामाल तर होतोच, पण गर्दीमुळे तारांबळही उडते. असाच धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला आहे.
एका ऑफरने संभाजीनगरमध्ये गोंधळ..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मकरसंक्रांतीचा सण काही दिवसांवर आला आहे. याच मकर संक्रांतींच्या सणानिमित्त छत्रपती संभाजीनगरमधील 'टेंज द फॅशन वर्ल्ड' या कापड दुकानात स्वस्तात मस्त साडीची ऑफर लागली होती. पाच हजारांची साडी अवघ्या 599 रुपयांत मिळणार अशी धमाकेदार स्कीम दुकानदाराने लावली.
या ऑफरने महिला वर्गांनी दुकानासमोर तुफान गर्दी केली. छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात असलेल्या या साडी सेंटरसमोर रविवारी तब्बल हजाराहून अधिक महिलांनी गर्दी केली. महिलांची गर्दी इतकी प्रचंड होती की अक्षरशः थरारक स्थिती निर्माण झाली. दुकान उघडताच एकाच वेळी आत शिरण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली.
महिला बेशुद्ध पडल्या, लहान मुलं हरवली
दुकानामध्ये एन्ट्री घेण्याच्या या गोंधळात ३ महिला श्वास गुदमरल्याने बेशुद्ध पडल्या, तर अनेक लहान मुलांची आईपासून ताटातूट झाली. सकाळी १० वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या. सोशल मीडियावर गेल्या तीन महिन्यांपासून सवलतींचे व्हिडिओ व्हायरल केले जात होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दुकान बंद केले. चार तास त्रिमूर्ती रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी आणि गोंधळ पाहायला मिळाला. या प्रकाराचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नक्की वाचा >> Maharashtra Election 2026 : महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी किती उमेदवार रिंगणात? पाहा संपूर्ण यादी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world