जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar News: शौचालयाचे शपथपत्र बंधनकारक, उमेदवारांची उडाली तारांबळ

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आता केवळ 4 दिवस उरले आहेत. मंगळवारपासून अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाली असून पहिल्या दोन दिवसांत तब्बल 3170 अर्जांची विक्री झाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar News:  शौचालयाचे शपथपत्र बंधनकारक, उमेदवारांची उडाली तारांबळ

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या वेगात सुरू आहे. मात्र, यंदा निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा बदल केला आहे. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या घरी शौचालय असल्याचे शपथपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नवीन नियमामुळे अनेक इच्छुकांची धावपळ उडाली असून, कागदपत्रे गोळा करताना त्यांची दमछाक होत आहे.

​शपथपत्र नसेल तर उमेदवारी रद्द होणार

निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, उमेदवारी अर्जातील प्रत्येक रकाना भरणे आवश्यक आहे. विशेषतः शौचालया संदर्भातील रकान्यात 'होय' किंवा 'नाही' असा स्पष्ट उल्लेख असणे गरजेचे आहे. जर एखाद्या उमेदवाराने हे शपथपत्र जोडले नाही किंवा माहिती अपूर्ण ठेवली, तर त्याचा उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. इतकेच नव्हे, तर निवडून आल्यानंतरही जर शौचालय नसल्याचे सिद्ध झाले, तर संबंधित सदस्याचे पद रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे.

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

​माजी नगरसेवकांकडून 'डमी' अर्जांचा आधार

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आता केवळ 4 दिवस उरले आहेत. मंगळवारपासून अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाली असून पहिल्या दोन दिवसांत तब्बल 3170 अर्जांची विक्री झाली आहे. कोणताही तांत्रिक दोष राहू नये आणि अर्ज बाद होऊ नये, यासाठी अनेक माजी नगरसेवक आणि दिग्गज इच्छुक उमेदवार प्रथम 'डमी' अर्ज भरून त्याची पडताळणी करून घेत आहेत. त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करण्यावर भर दिला जात आहे.

2016 च्या कायद्यातील दुरुस्तीची कडक अंमलबजावणी

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि संबंधित कायद्यांमध्ये 2016मध्ये महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आली होती. यानुसार, उमेदवाराच्या स्वतःच्या मालकीच्या घरात शौचालय असणे आणि त्याचा वापर करणे आवश्यक आहे. जर उमेदवार अशा ठिकाणी राहत असेल जिथे वैयक्तिक शौचालय नाही, तर त्यांना सार्वजनिक किंवा सामुदायिक शौचालयाचा नियमित वापर करत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणारी ही महापालिकेची पहिलीच निवडणूक ठरत आहे.

(नक्की वाचा- समृद्धी महामार्ग आजपासून 3 दिवस टप्प्याटप्प्याने बंद राहणार; कुठे-कुठे आणि कधी असणार ब्लॉक?)

​प्रशासकीय तयारी आणि उमेदवारांची गर्दी

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ९ केंद्रांवर अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. नाताळच्या सुटीनंतर आता पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी केंद्रांवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी सर्व कागदपत्रे आणि शौचालयाचे शपथपत्र वेळेत पूर्ण करूनच अर्ज सादर करावा, जेणेकरून ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com