- मोसीन शेख, प्रतिनिधी
Abdul Sattar Wife Death: सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसाबेगम अब्दुल सत्तार यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सिल्लोड शहरासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
एक खंबीर नेतृत्व हरपले
नफिसाबेगम यांनी केवळ एका राजकीय नेत्याची पत्नी म्हणूनच नव्हे तर स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून त्यांनी शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
(नक्की वाचा: Chhatrapati Sambhajinagar News: अब्दुल सत्तारांच्या दर्शनाने नागेश्वर मंदिर अपवित्र? तरुणांनी गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण)
आमदार अब्दुल सत्तार यांच्या राजकीय वाटचालीत नफिसाबेगम यांचा मोठा वाटा होता. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच सत्तार यांच्या प्रत्येक संघर्षात त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या निधनामुळे सत्तार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिल्लोडमधील जनतेने आपला एक आधारवड गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नफिसाबेगम यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यविधी
नफिसाबेगम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सिल्लोड येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती आमदार अब्दुल सत्तार, मुले, सुना असा परिवार आहे. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अंत्यविधी पार पडतील.
राजकीय आणि सामाजिक स्तरातून श्रद्धांजली
नफिसाबेगम यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world