
लातूर जिल्ह्यातील औसा ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औसा येथे शस्रक्रीया करून प्रसूती केलेल्या महिलेच्या पोटात नॅपकिन निघाल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तीन महिने नॅपकिन पोटात राहिल्याने ही महिला मरणाच्या जबड्यातून थोडक्यात बचावली आहे. हबीबा वसीम जेवळे असे त्या महिलेचे नाव आहे. ही महिला प्रसूतीसाठी औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी हा प्रकार घडला होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हबीबा जेवळे यांच्या 23 एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बाळ जन्माला आल्यानंतर रक्त पुसण्यासाठी वापरला जाणारा नॅपकिन त्यांच्या पोटातच राहीला. तसेच टाके त्यांना मारण्यात आले. त्यानंतर महिलेला घरी सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर महिलेला त्रास होवू लागला. तिच्या पोटातून पाणी येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने ही महिला पुन्हा औसा ग्रामीण रुग्णालयात आली. त्यानंतर येथील डॉक्टरांनी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले.
तेथे या महिलेवर जवळपास वीस दिवस उपचार करण्यात आले. तरीही टाक्यातून पू येत असल्याने औशातील दोन खाजगी डॉक्टरांचा उपचार या महिलेने घेतला. मात्र टाके भरून येत नसल्याने त्यांनी उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखविले. सोनोग्राफी, सीटी स्कॅन केल्यावर पोटात गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ काढण्यासाठी ऑपरेशन केले असता पोटात गाठ नाही तर चक्क दीड बाय एक फुटाचा नॅपकिन निघाला. हा कपडा औशाच्या रुग्णालयातच राहिल्याचा आरोप महिलेसह नातेवाईकांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Pune Hit and Run : पुण्यात आणखी एक हिट अँड रन; मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू
पोटात नॅपकिन निघालेल्या महिलेल्या प्रकरणावरून रूग्णालय प्रशासन गंभीर आहे. या संदर्भात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीच्या चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. असे डॉ भारतकुमार थडकर यांनी स्पष्ट केले आहे.ते औसा ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. जर वेळेत उपचार केले नसते तर या महिलेच्या जिवावर बेतले असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world