
मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुमाल कामराच्या गाण्यावरुन राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या विडंबनात्मक कवितेवर शिंदे गटाने आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी रात्री शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराचा कार्यक्रम झालेल्या हॉटेलचीही तोडफोड केली. या सगळ्या वादानंतर आता कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर केलेल्या उपहासात्मक कवितेमुळे प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिल तो पागल है या गाण्याच्या चालीवर कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर एक कविता केली ज्यामध्ये एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडापासून ते गुवाहाटी पर्यंतचा प्रवास मांडला आहे. या गाण्यामध्ये कुणाचेही नाव घेतले नाही मात्र गद्दारचा उल्लेख झाल्याने शिंदे गट संताप व्यक्त केला.
तसेच हे गाणे व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी अंधेरीमधील त्याचा कार्यक्रम झालेल्या द हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली. त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांनी कुणाल कामराने माफी मागितली नाही तर त्याला प्रसाद देण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. या संपूर्ण वादावर आता कुणाल कामराने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडे कुणाल कामराने या संपूर्ण वादावरुन आपली प्रतिक्रिया मांडली आहे. मला गद्दार बोलल्याचा कोणताही पश्चाताप नाही. मला कोर्टाने जर सांगितले तरच मी माफी मागेल असे म्हणत कुणाल कामराने आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच यासाठी विरोधकांचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्याने फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, एकीकडे कुणाल कामराने केलेल्या काव्यावरुन सत्ताधारी आक्रमक झाले असतानाच विरोधकांनी मात्र त्याला समर्थन दिले आहे. कुणाल कामराने कोणाचेही नाव घेतले नाही, मग गद्दार म्हणल्यानंतर तुम्हाला का मिरच्या झोंबतात? तुम्ही गद्दार आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उपस्थित केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world