अमोल सराफ, प्रतिनिधी
Congress leader train accident : जीवघेण्या धावपळीचे ज्वलंत उदाहरण देणारी एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती आणि पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कामावरून घरी परतत असताना बुधवारी (12 नोव्हेंबर) संध्याकाळी सुमारे 7:30 वाजता ही दुर्घटना कसारा रेल्वे स्टेशन परिसरात घडली. या बातमीमुळे चिखली तालुक्यासह संपूर्ण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
कसा झाला अपघात?
डॉ. सत्येंद्र भुसारी हे नुकतेच काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित एका मुंबई येथील बैठकीसाठी गेले होते. पक्षाच्या कामामुळे सतत धावपळीत असलेल्या डॉ. भुसारी यांचा मुंबईहून चिखलीकडे (बुलढाणा) परत येत असताना कसारा घाटात धावत्या रेल्वेतून पडून अपघात झाला. रेल्वेतून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या रेल्वेगाडीतून हा अपघात झाला, ती गाडी कसारा रेल्वे स्टेशनवर थांबत नव्हती. हा अपघात नेमका कसा घडला, याची कसून चौकशी आणि तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
( नक्की वाचा : Buldhana News : डोळ्यांदेखत कोळसा ! बुलडाण्यात गर्भवती पत्नीचा पतीसमोरच होरपळून मृत्यू )
कोण होते डॉ. सत्येंद्र भुसारी?
डॉ. सत्येंद्र भुसारी यांची ओळख एक अत्यंत मनमिळावू आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून होती. त्यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या याच योगदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने त्यांची नुकतीच पैठण विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून निवड केली होती.
अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण चिखली तालुक्यावर आणि जिल्ह्यात शोककळा पसरली.माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते राहुल बोंद्रे यांनी माहिती मिळताच मुंबईहून घटनास्थळाकडे धाव घेतली.
चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले यांनीही स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदत आणि सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. डॉ. भुसारी यांच्या निधनाने चिखली तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world