महाराष्ट्राच्या राजकारणात नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनंतर सत्तास्थापनेसाठी जे 'विचित्र' प्रयोग राबवले जात आहेत, त्याने राजकीय विश्लेषकांसह सामान्य मतदारांच्याही भुवया उंचावल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये भाजपने थेट काँग्रेसशी घरोबा केला आहे, तर अकोल्यातील अकोटमध्ये चक्क 'एमआयएम' (MIM) या पक्षासह अन्य पक्षांशी हातमिळवणी करत सत्ता हस्तगत केली आहे. या अनैसर्सिक आघाड्यांमुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज असून, त्यांनी आपली नाराजी तीव्र शब्दात व्यक्त केली आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या आघाडीबद्दल नाराजी व्यक्त केली असून त्यांनी कारवाईचा बडगाच उचलला आहे.
नक्की वाचा: अंबरनाथमध्ये काँग्रेस, तर अकोटमध्ये MIM शी युती, भाजपच्या निर्णयावर CM फडणवीस संतापले
काँग्रेसने केले एकाचे निलंबन
अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करणाऱ्या स्थानिक काँग्रेस नेत्यांवर प्रदेश काँग्रेसने कठोर कारवाई केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांचे निलंबन करण्यात आले असून, संपूर्ण ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे. "काँग्रेसमुक्त भारत" अशी घोषणा देणाऱ्या भाजपला अंबरनाथ नगरपरिषदेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने मदतीचा हात दिला आहे. अंबरनाथमध्ये भाजपकडे 15 आणि काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहेत. या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या 4 सदस्यांना सोबत घेत 'अंबरनाथ विकास आघाडी' स्थापन केली,यामुळे 28 नगरसेवक असूनही शिंदे गटाला सत्तेबाहेर बसावे लागले होते.
'अकोट विकास मंच'च्या प्रयोगावर फडणवीसांची नाराजी
अकोट नगरपालिकेमध्ये 'अकोट विकास मंच' स्थापन करण्यात आला होता. यामध्ये भाजप आणि इतर काही पक्षांचा समावेश आहे. विशेष बाब ही आहे की भाजपने धार्मिक तेढ पसरवत असल्याचा वारंवार आरोप केलेल्या असदुद्दीन औवैसींचा पक्ष MIM देखील आहे. 'अकोट विकास मंच'मध्ये भाजप, MIM सह ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह बच्चू कडूंचा प्रहार पक्षही सामील आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथ आणि अकोटमधील या राजकीय घडामोडींसंदर्भात भाजपच्या नेत्यांशी बोलण्याचा निर्णय घेतला असून "काँग्रेससोबत का गेलात?" अशी विचारणा ते स्थानिक नेत्यांकडे करणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अशा युतीमुळे मतदारांमध्ये भाजपच्या विचारधारेबद्दल चुकीचा संदेश गेल्याचे मुख्यमंत्र्यांचे मत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world