
योगेश शिरसाट, अकोला प्रतिनिधी
Akola News : अकोल्यात ‘किसान ब्रिगेड'च्या वतीने आयोजित शेतकरी लूट वापसी संवाद सभेत प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बच्चू कडू यांनी नुकत्याच झालेल्या जळगाव आंदोलनाचा उल्लेख करत, “तेथे आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचा गेट तोडला, पण पुढील आंदोलनात थेट कलेक्टरलाच तोडू,” असा इशारा दिला. या विधानामुळे सभेत खळबळ उडाली असून राज्यभर त्याची चर्चा रंगली आहे.
तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अधिकच वादग्रस्त विधान करत, “नेपाळमध्ये आंदोलनादरम्यान घडल्याप्रमाणे दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही,” असे वक्तव्य केले. त्यामुळे शेतकरी सभेतून निर्माण झालेला वाद अधिक तीव्र झाला आहे.
नक्की वाचा - Chhagan Bhujbal: अंतरवालीतील लाठीचार्जला पवारांचा 'तो' पराभूत आमदार जबाबदार? भुजबळांच्या गौप्यस्फोटाने राजकारण तापले
या सभेला विविध शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. त्यात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आपली जमीन विकू नये, असे आवाहन केले. यावेळी शेतकरी कर्जमाफी, हमीभावाची हमी आणि अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या मागण्या पुढे आल्या. बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांच्या आक्रमक विधानांमुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world