संकेत कुलकर्णी, पंढरपूर
पंढरपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एक धक्कादायक आणि वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर आपल्या लहान मुलाकडून मतदान करवून घेतल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात वर्चस्व असलेल्या मोहिते पाटील घराण्यातील सदस्याच्या एका कृतीमुळे पंढरपुरात मोठा वाद निर्माण झाला आहे. फोंडशिरस जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या लहान मुलाला, रुद्रराज याला मतदान केंद्राच्या आत नेले आणि त्यानंतर मुलानेच ईव्हीएम (EVM) मशीनचे बटण दाबल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
(नक्की वाचा- Eknath Khadse: मोठी बातमी! एकनाथ खडसेंसह पत्नीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, प्रकरण काय?)
मतदान केंद्रावर नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनसिंह मोहिते पाटील हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावर गेले असता त्यांनी आपल्या लहान मुलालाही सोबत नेले होते. मतदान केंद्र अध्यक्षांनी लहान मुलाला आत नेण्यास मज्जाव केला आणि आक्षेप घेतला. नियमानुसार मतदानाच्या कक्षात केवळ मतदारालाच प्रवेश असतो. प्रत्यक्षदर्शी आणि राजकीय विरोधकांच्या दाव्यानुसार, मतदान यंत्रापाशी गेल्यावर लहान मुलानेच बटण दाबले.
(नक्की वाचा- Mumbai News: शिमल्याला फिरायला जाणं जीवावर बेतू शकतं! मुंबईतील महिलेसोबत काय घडलं?)
अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचे स्पष्टीकरण
या आरोपांनंतर अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी म्हटले की, "आई-वडील मतदान कसे करतात, हे पाहण्याची मुलाची इच्छा होती, म्हणून त्याला सोबत आणले होते." मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाची गोपनीयता राखणे बंधनकारक असते, त्यामुळे मुलाला मतदान यंत्रापर्यंत नेणे हे नियमांचे उल्लंघन मानले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world