मुंबई शहरातील वाहतूक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, यूके सरकारच्या वाहतूक खात्याअंतर्गत येणाऱ्या (डीएफटी) क्रॉसरेल इंटरनॅशनल (सीआय) यांच्या माध्यमातून यूके सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाशी (एमएमआरडीए) सामंजस्य करार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीए अध्यक्ष, एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांच्या पुढाकाराने तर जोनाथन रेनॉल्ड्स, सेक्रेटरी, बिझनेस अँड ट्रेड, पॉल डायसन, सीईओ-क्रॉसरेल इंटरनॅशनल यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. करारामुळे शहराच्या पायाभूत सुविधांच्या प्रवासात महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे.
मुंबईतील मेट्रो नेटवर्कचे काम वेगाने पूर्ण करून झपाट्याने होणाऱ्या शहराच्या विकासाला पाठबळ देणारी एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. तसेच, एमएमआरडीए हे भारतातील शहरी पायाभूत सुविधांसाठी आदर्श प्राधिकरण म्हणून स्थापित करणे हा यामागील मुख्य हेतू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
सामंजस्य कराराची ठळक वैशिष्ट्य:
• दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये झालेल्या या करारामध्ये जागतिक दर्जाची इंटरमोडल (विविध वाहतूक पर्याय म्हणजे मेट्रो, बस सेवा, रिक्षा-टॅक्सी सेवा यांचा समन्वय साधून प्रवाशांचा प्रवास सुरळीत करणे) वाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. यात मुंबईतील आगामी 14-लाइन मेट्रो नेटवर्कच्या कामकाजाचा आणि देखभाल धोरणाचाही समावेश आहे.
• यूकेचे व्यापार सचिव जॉनथन रेनॉल्ड्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसंदर्भात यूके आणि भारत यांच्यातील सहकार्य आणखी मजबूत करण्यावर चर्चा केली.
• या सामंजस्य कराराच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रातील आपले कौशल्य उपलब्ध करून देणे, गुंतवणुकीला चालना देणे आणि रोजगारनिर्मिती करणे
सामंजस्य करारातील महत्त्वाचे मुद्दे:
1. एकात्मिक पायाभूत विकास: इंटरमोडल कनेक्टिव्हिटी, प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या वाहतूक पर्यायांमध्ये सुधारणा (फर्स्ट अँड लास्ट माइल प्रवास पर्याय), तसेच डिजिटल परिवर्तनाद्वारे प्रवास सुलभ करणे.
2. शाश्वतता आणि नवकल्पना: लँड व्हॅल्यू कॅप्चर (एलव्हीसी) आणि ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) यांसारख्या निधीपुरवठा प्रारुपांवर भर देऊन शहरांच्या शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे.
3. जागतिक पातळीवर ज्ञानाची देवाणघेवाण: भारत आणि यूकेमधील शैक्षणिक संस्थांसोबत भागीदारी करून संशोधन आणि नवकल्पनांना चालना देणे.
4. तज्ज्ञांचे सहकार्य: ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल), नेटवर्क रेल आणि यूके एक्स्पोर्ट फायनान्स यांसारख्या यूकेमधील संस्थांच्या कौशल्याचा लाभ घेऊन जागतिक दर्जाची प्रकल्प अंमलबजावणी सुनिश्चित करणे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world