शरद सातपुते, सांगली
सांगलीच्या म्हैसाळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. विजेचा शॉक लागून बाप-लेकासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक जण जखमी झाला आहे. मृतांमध्ये एका 13 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या ठिकाणी एक कुत्रा देखील ठार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिशनाथ मारुती व्हनमोरे (वय 40) साईराज व्हनमोरे (वय 13) आणि प्रदीप श्रीकृष्ण व्हनमोरे (वय 35) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. तर हेमंत पारिशनाथ व्हनमोरे (वय 14) असे जखमी मुलाचे नाव आहे.
(नक्की वाचा- Audio Clip : "अक्षय शिंदे याची जी हत्या झाली..", जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ)
म्हैसाळमध्ये राहणारे व्हनमोरे कुटुंबातील वडील, भाऊ आणि दोन मुले असे चौघेजण त्यांच्या सुतारमळा येथे असणाऱ्या शेतामध्ये सकाळी वैरण काढण्यासाठी गेले होते. शेतात वैरण काढत असताना शेतात पडलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्युत तारेचा त्यांचा स्पर्श झाला. यामध्ये वडील आणि काका विजेचा शॉक लागल्याने खाली पडले.
वडील आणि काका खाली पडले हे पाहायला गेलेल्या मुलांना देखील विजेचा शॉक लागला. यामध्ये यामध्ये तिघेजण ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. यावेळी त्यांचासोबत आलेला कुत्रा देखील विजेचा शॉक लागल्याने ठार झाला आहे.
(नक्की वाचा - आता पती पत्नींच्या मार्गातला काटा का ठरतोय? अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर)
या घटनेनंतर ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर या घटनेप्रकरणी वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी करण्यात येत आहे.