जाहिरात

Nandurbar News: सातपुड्याच्या कुशीत ड्रोनची भरारी! अतिदुर्गम भागात आता आकाशातून पोहोचणार औषधे आणि लस

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम धडगाव तालुक्यात ड्रोनद्वारे औषध आणि लस वितरणाची दुसरी चाचणी यशस्वी झाली आहे. आयआयटी मुंबईच्या तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते नसलेल्या पाड्यांवर पावसाळ्यातही गरोदर माता आणि बालकांसाठी ही आरोग्यसेवा वरदान ठरणार आहे.

Nandurbar News: सातपुड्याच्या कुशीत ड्रोनची भरारी! अतिदुर्गम भागात आता आकाशातून पोहोचणार औषधे आणि लस
प्रातिनिधीक फोटो

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि क्रांतिकारी बातमी समोर आली आहे. भौगोलिक अडचणींमुळे जिथे आजही पक्के रस्ते पोहोचू शकलेले नाहीत, अशा दुर्गम पाड्यांवर वेळेत वैद्यकीय मदत देण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने थेट ड्रोन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे. धडगाव तालुक्यात नुकतीच ड्रोनद्वारे औषध आणि लस वितरणाची दुसरी चाचणी  अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.

4 किलोमीटरचे अंतर केवळ काही मिनिटांत पार

धडगाव तालुक्यातील वेलखेडी ते हिंगलापाणी या साधारण 4 किलोमीटरच्या खडतर अंतरावर ही चाचणी घेण्यात आली. या दुर्गम मार्गावर ड्रोनच्या मदतीने ओआरएस (ORS) पाकिटे, जीवनरक्षक औषधे आणि बालकांसाठीच्या आवश्यक लसी यशस्वीरित्या पोहोचवण्यात आल्या. डोंगराळ रस्ता आणि दऱ्याखोऱ्यांमुळे ज्या अंतरासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना पायी चालत तासनतास लागत असत, तेच अंतर ड्रोनने अवघ्या काही मिनिटांत पार करून दाखवले.

(नक्की वाचा-  Crime News: सोशल मीडियावर 'शो-ऑफ' पडला महागात! प्रसिद्ध महिला युट्यूबरच्या घरावर दरोडा; कुटुंबाला खोलीत कोंडलं)

आयआयटी मुंबईचे विशेष तंत्रज्ञान

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी आयआयटी मुंबई (IIT Bombay) च्या विशेष तज्ज्ञांनी विकसित केलेल्या प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे ड्रोन वजनदार औषधांचे पार्सल घेऊन दुर्गम भागात अचूक लँडिंग करण्यास सक्षम आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने दुर्गम भागातील रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आयआयटी मुंबईच्या या तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कामाला कमालीची गती मिळणार आहे.

पावसाळ्यात गरोदर माता आणि बालकांसाठी संजीवनी

सातपुड्यातील आदिवासी पाड्यांना पावसाळ्यात सर्वाधिक फटका बसतो. मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येतो आणि अनेक गावांचा मुख्य शहरांशी संपर्क पूर्णपणे तुटतो. अशा काळात गावातील गरोदर माता, नवजात बालके आणि गंभीर रुग्णांना वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने अनेकदा अनर्थ ओढवतो.

(नक्की वाचा-  Pune Crime: PSI असल्याचं भासवण्यासाठी वर्दी घातली, पण एक बारीक चूक अन् अधिकाऱ्याच्या हुशारीने महिलेचा पर्दाफाश))

आता ड्रोनच्या वापरामुळे पावसाळ्यातील या नैसर्गिक अडचणींवर कायमची मात करणे शक्य होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही अडथळ्याविना थेट पाड्यावर औषध पोहोचणार असल्याने, हा अनोखा उपक्रम सातपुड्यातील आदिवासी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी आणि एक मोठे वरदान ठरणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com