
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी जाहीरपणे अजित पवारांविरोधात भूमिका घेतली होती. तसेच ते भाजपमध्ये जाणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा सुरु असतानाच पक्षाने छगन भुजबळ यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे, त्यासोबतच सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांनाही मानाचे स्थान देण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पक्षाची संघठन बांधणी, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांचा एक 'कोअर ग्रुप' स्थापन करण्यात आला आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांसह, पक्षसंघठनेची बांधणी, त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भातील महत्वाच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्वाचा उद्देश आहे.
राष्ट्रवादीच्या या कोअर कमिटीमध्ये सध्या संतोष देशमुख प्रकरणांवरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. तसेच नाराज असलेल्या छगन भुजबळांनाही स्थान देण्यात आले आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी परिपत्रक काढून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
या कोअर कमिटीमध्ये पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ, दिलीपराव वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांची रणनिती तसेच पक्षबांधणीची जबाबदारी या सदस्यांवर असणार आहे.
दरम्यान, मंत्रिपदामुळे सध्या ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज आहेत. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. विरोधकांसह भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच अजित पवार यांनी त्यांना पक्षात मानाचे स्थान दिल्याने दादांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world