जाहिरात

K.P. Raghuvanshi: "बाळासाहेबांना अटक करण्यासाठी भुजबळांचा दबाव होता", माजी ATS प्रमुख यांचा खळबळजनक खुलासा

K.P. Raghuvanshi Biography: मालेगाव स्फोट प्रकरणाचा तपास सुरू असताना, युपीए सरकारमधील एका बड्या मंत्र्याने आरएसएसचे पदाधिकारी *इंद्रेश कुमार* यांना अटक करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला होता, असा दावा रघुवंशी यांनी केला आहे.

K.P. Raghuvanshi: "बाळासाहेबांना अटक करण्यासाठी भुजबळांचा दबाव होता", माजी ATS प्रमुख यांचा खळबळजनक खुलासा

K.P. Raghuvanshi Biography: माजी एटीएस प्रमुख के. पी. रघुवंशी सध्या त्यांच्या 'ट्रबलशूटर' (Troubleshooter) या पुस्तकामुळे चर्चेत आले आहेत. पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी लिहिलेल्या या पुस्तकात रघुवंशी यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीतील अनेक पडद्यामागच्या घडामोडींवरून पडदा उचलला आहे. तत्कालीन युपीए (UPA) सरकार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी विशिष्ट राजकीय अजेंडा राबवण्यासाठी कसा दबाव टाकला होता, याचे सविस्तर वर्णन यात करण्यात आले आहे.

मालेगाव स्फोट आणि इंद्रेश कुमार यांना अटकेचा दबाव

2008 च्या मालेगाव स्फोट प्रकरणाचा तपास सुरू असताना, युपीए सरकारमधील एका बड्या मंत्र्याने आरएसएसचे पदाधिकारी इंद्रेश कुमार यांना अटक करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला होता, असा दावा रघुवंशी यांनी केला आहे.  कुमार यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याने रघुवंशी यांनी अटकेचा आदेश मानण्यास नकार दिला होता. या नकारामुळे मंत्र्यांच्या मनात रघुवंशी यांच्याबद्दल संशय निर्माण झाला. कर्नल पुरोहित यांच्यासोबतचा एक जुना फोटो वापरून रघुवंशी आरोपींना मदत करत असल्याचा बनाव रचला गेला. शेवटी 2010  मध्ये रघुवंशी यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना अचानक महाराष्ट्र एटीएसच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आले होते. माहिती 'लीक' केल्याचे निमित्त करून त्यांची एटीएस प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

छगन भुजबळांचा संताप

1993 च्या मुंबई दंगलीबाबत श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ प्रचंड आग्रही होते. पुस्तकातील उल्लेखानुसार, जेव्हा रघुवंशी यांनी कायदेशीर सल्ला घेत ठाकरेंना अटक करण्यास असमर्थता दर्शवली, तेव्हा भुजबळ संतापून म्हणाले होते, "रघुवंशी… सूर्यवंशी, तुम्ही कोण असाल ते असाल… पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना अटक करायला का घाबरता?" या वादामागे 1991 मध्ये भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतरचा वैयक्तिक संघर्ष आणि 1996 मध्ये त्यांच्या बंगल्यावर झालेला हल्ला ही पार्श्वभूमी असल्याचे पुस्तकात सांगण्यात आले आहे.

श्रीकृष्ण आयोगाने ठाकरेंवर हिंसाचार भडकवल्याचा ठपका ठेवला होता, तरीही एसटीएफचे कायदेशीर सल्लागार ॲड. पी. आर. वकील यांनी खटला न भरण्याचा सल्ला दिला होता. याचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे आणि पत्रकार युवराज मोहिते हे दोन महत्त्वाचे साक्षीदार जबाब देण्यासाठी एसटीएफसमोर हजर झाले नव्हते, असं पुस्तकात सांगण्यात आलं आहे.

सोनिया गांधी आणि विलासराव देशमुखांची दिल्लीवारी

पुस्तकात असाही दावा करण्यात आला आहे की, श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावर कारवाई करण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून मोठा दबाव होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी रघुवंशी यांना थेट दिल्लीला नेले होते, जेणेकरून ते सोनिया गांधी यांना तपासाच्या प्रगतीबद्दल स्वतः माहिती देऊ शकतील. 1999 च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी हा सर्व राजकीय प्रयत्न सुरू होता.

के. पी. रघुवंशी यांची कारकीर्द

के. पी. रघुवंशी हे केवळ वादांमुळेच नव्हे, तर त्यांच्या धडाकेबाज कामासाठीही ओळखले जातात. 1980 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या रघुवंशी यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या विभागांचे नेतृत्व केले. यामध्ये मुंबई दंगलीवरील श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करणारे विशेष कार्य दल (STF), महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि ठाणे पोलीस आयुक्तलयाचा समावेश आहे. गडचिरोलीतील नक्षलविरोधी विशेष 'सी-60' फोर्स स्थापन करण्याचे श्रेयही रघुवंशी यांना दिले जाते.

सध्या रघुवंशी निवृत्त असून आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या दक्षता विभागाचे नेतृत्व करत आहेत. 'ट्रबलशूटर' हे पुस्तक भारतीय पोलीस दल आणि राजकारण यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांवर भाष्य करणारे एक महत्त्वाचे दस्तऐवज ठरत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com