Dharashiv News: तहसीलदारांना मुलीसमोरच गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी; परंडा तहसील कार्यालयातील प्रकार

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध वाळू उपशाच्या तक्रारीवरून तहसीलदार आणि एका तक्रारदारात जोरदार राडा झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

ओंकार कुलकर्णी, धाराशिव

अवैध वाळू उपशाचा मुद्दा धाराशिव जिल्ह्यात चांगलाच तापला असून, परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात चक्क तहसीलदारांना गाडी अडवून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसीलदार निलेश काकडे आणि तक्रारदार यांच्यातील या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेच्या निषेधार्थ महसूल संघटनेने काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेली माहिती अशी की, तहसीलदार निलेश काकडे हे आपल्या चिमुकल्या मुलीसह शासकीय गाडीतून जात असताना एका तक्रारदाराने त्यांची गाडी अडवली. अवैध वाळू उपशाविरोधात मी दिलेल्या निवेदनावर काय कारवाई केली? असा सवाल करत तक्रारदाराने तहसीलदारांशी हुज्जत घातली. "आत्ताच कारवाई कर, नाहीतर तुला जीवे मारून टाकेन" असं म्हणत थेट धमकी तहसीलदारांना देण्यात आल्याचा आरोप तहसीलदार काकडे यांनी केला आहे.

Advertisement

यावेळी दोघांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. विशेष म्हणजे तहसीलदार आपल्या लहान मुलीसोबत असताना हा प्रकार घडल्याने त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला.

(नक्की वाचा-  VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?)

महसूल विभाग आक्रमक

तहसीलदारांसारख्या जबाबदार अधिकाऱ्याला कार्यालयाच्या आवारातच धमकी मिळाल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तहसीलदार निलेश काकडे यांच्या तक्रारीवरून परंडा पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करून त्याला 'एमपीडीए' (MPDA) कायद्यांतर्गत अटक करावी, अन्यथा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा महसूल संघटनेने दिला आहे.

(नक्की वाचा-  LPG Prices: एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढणार? पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होणार? सद्यस्थिती काय?)

अवैध वाळूचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

परंडा आणि परिसरात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असून, महसूल प्रशासन यावर ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप तक्रारदारांकडून केला जात आहे. मात्र, कारवाईची मागणी करताना थेट अधिकाऱ्यांना धमकावणे हे चुकीचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

Topics mentioned in this article