नागिंद मोरे, धुळे:
Dhule News: उभा केलेला ट्रॅक्टर अचानक सुरु होऊन तीन मुलींसह विहिरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना धुळ्याच्या साक्री तालुक्यात घडली आहे. या तीन मुलींपैकी एकीला वाचवण्यात यश आले असून दोघींचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून घटनास्थळी पोलिसांसह गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. नेमकं काय घडलं? जाणून घ्या..
खेळता खेळता अनर्थ घडला
समोर आलेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील गणेशपुर येथे कांदे भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळला, यावेळी ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या तीन मुलीही विहिरीत पडल्या, त्यापैकी एकीला वाचवण्या यश आले आहे. दोन मुलींचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता, यावेळी घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक वळवी व त्यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने बेपत्ता बालिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.
Akola News: घरात लागली भीषण आग! सरकारी रुग्णावाहिका न पोहोचल्याने आजीबाईंचं 'आरोग्य' धोक्यात
तीन मुलींसह ट्रॅक्टर विहिरीत..
गणेशपूर गावाचे माजी पोलीस पाटील प्रकाश मराठे यांच्या गावा शेजारील शेतात चाळीतील कांदा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम सुरू होते. काम करणाऱ्या मजुरांची काही मुले ट्रॅक्टरवर खेळत होती. खेळताना अचानकपणे ट्रॅक्टर सुरू झाला व काही अंतरावर असलेल्या विना कठड्याच्या साधारणत: 60 फूट खोल पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत तिघा चिमुकलींसह कोसळला. खुशी दाजू ठाकरे (वय 3 वर्ष), ऋतिका संदीप गायकवाड (3 वर्ष) हे खोल विहिरीत पडल्याने पाण्यात बेपत्ता झाले. तर परी संदीप गायकवाड या दोन वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले.
मात्र अनेक तासांपासून ट्रॅक्टरसोबत पाण्यात गेलेल्या बालिकांचा अजून तपास न लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी पाणी पंपाच्या सहाय्याने उपसण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मदत कार्यासाठी घटनास्थळी जेसीबी मागवण्यात आले असून साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वात मदतकार्य व शोध कार्य गावकऱ्यांच्या व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या ठिकाणी गणेशपूरसह परिसरातील दिघावे, कासारे, छाईल, सायने या गावातील ग्रामस्थ मदत कार्यासाठी मदत करीत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.
Palghar Crime: चौकशीसाठी बोलावलं.. पोलीस ठाण्यातचं महिलेसोबत भयंकर घडलं, हवालदाराचे दुष्कृत्य
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world