आकाश सावंत, बीड
Beed News : परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे दोन गट आमनेसामने आल्याने शनिवारी रात्री हाणामारीची घटना घडली आहे. बॅनर लावल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद हाणामारीत बदलला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली, काठ्या आणि कुऱ्हाडीने हल्ला चढवला. या हिंसक झटापटीत पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, एका गटाने घरासमोर लावलेला बॅनर हा वादाचा केंद्रबिंदू ठरला. यावरून दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. मात्र ही बाचाबाची तुफान राड्यात बदलली. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला पण दोन्ही बाजूंनी रोष वाढल्याने हिंसाचार टाळता आला नाही. या हाणामारीत घरांचं नुकसानही झाल्याचे समजते.
(नक्की वाचा- Satara News: आली लहर केला कहर! नव्या गाडीचं सेलिब्रेशन, थेट महामार्गच रोखला, मग पुढे...)
परिसरात पोलीस बंदोबस्त
दरम्यान, एका गटाने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटाकडून अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलिसांनी घटनेनंतर वसंतनगर परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
(नक्की वाचा- Shocking News: 10 दिवसांचं प्रेम, रुमवर रोमान्स.. शारीरिक संबधावेळी अल्पवयीन मुलीचा मृत्यू; असं काय घडलं?)
स्थानिक नेतृत्वाचे मात्र मौन
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेतृत्व मात्र या प्रकारावर मौन बाळगत असल्याचं चित्र आहे. राजकीय वर्चस्वाच्या संघर्षात कार्यकर्ते असे एकमेकांवर तुटून पडतात, हे दुर्दैवी असून यामागचं राजकीय टोकाचं वातावरण चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी दोन्ही गटांशी चर्चा सुरू केली असून पुढील कारवाई सुरू आहे. ग्रामीण भागात राजकीय मतभेदातून हिंसाचार उफाळून येणं ही गंभीर बाब आहे, असं नागरिकांमध्ये बोललं जातंय.