जाहिरात

Latur News: खून करून आत्महत्येचा बनाव, भाऊबीजेच्या दिवशीच विवाहितेचा छळाचा अंत; 6 जणांविरुद्ध गुन्हा

Latur Crime News: अंजलीच्या माहेरच्या मंडळींच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अंजलीच्या हाताची नस कापून, तिचा गळा आवळला आणि नंतर मृतदेह पंख्याला लटकवण्याचा प्रयत्न केला.

Latur News: खून करून आत्महत्येचा बनाव, भाऊबीजेच्या दिवशीच विवाहितेचा छळाचा अंत; 6 जणांविरुद्ध गुन्हा

त्रिशरण मोहगावकर, लातूर

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील गोपाळ नगर भागात एका विवाहितेच्या मृत्यूमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाऊबीजेच्या पवित्र सणाच्या दिवशीच सासरच्या मंडळींनी तिचा खून करून, तो आत्महत्येचा बनाव असल्याचे भासवल्याची तक्रार माहेरच्या मंडळींनी केली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील धामनगाव येथील गणपत कांबळे यांची मुलगी अंजली हिचा विवाह उदगीर शहरात राहणाऱ्या नवनाथ जरीपटके या तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना अडीच वर्षांचा मुलगा आहे. मात्र, लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनंतरच अंजलीचा छळ सुरू झाला होता. या छळाचा शेवट भाऊबीजेच्या दिवशी झाला.

(नक्की वाचा- Satara Doctor Suicide Case: डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला अटक)

अंजलीच्या माहेरच्या मंडळींच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अंजलीच्या हाताची नस कापून, तिचा गळा आवळला आणि नंतर मृतदेह पंख्याला लटकवण्याचा प्रयत्न केला. मृत्यू झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी अंजलीला परस्पर दवाखान्यात दाखल केले आणि नंतर माहेरच्या मंडळींना कळवले. यामुळे माहेरच्या मंडळींनी आक्रमक पवित्रा घेत, गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

यानंतर माहेरच्या मंडळींनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे पोलीस स्टेशनसमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

(नक्की वाचा- Satara News: "माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला..." पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या)

6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माहेरच्या मंडळींच्या मागणीनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत 6 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.भाऊबीजेच्या दिवशीच झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com