जाहिरात

Kalyan News: भाईचा बर्थडे, जेलबाहेर फटाके अन्... कल्याण पोलिसांकडून समर्थकांचा असा झाला 'करेक्ट कार्यक्रम'!

Kalyan News: कल्याणमधील आधारवाडी कारागृहाबाहेर 'भाई'च्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणे समर्थकांना भलतेच महागात पडले आहे

Kalyan News: भाईचा बर्थडे, जेलबाहेर फटाके अन्... कल्याण पोलिसांकडून समर्थकांचा असा झाला 'करेक्ट कार्यक्रम'!
Kalyan News : हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली
कल्याण:

Kalyan News:  कल्याणमधील आधारवाडी कारागृहाबाहेर 'भाई'च्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणे समर्थकांना भलतेच महागात पडले आहे. आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जेलच्या मुख्य दरवाजासमोर फटाक्यांची आतिषबाजी करणाऱ्या तरुणांची पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या असून, ज्या जेलच्या दरवाजासमोर त्यांनी फटाके फोडले, त्याच परिसरात पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगरमधील एका हत्या प्रकरणात सतीश कांबळे उर्फ सत्या भाई हा गेल्या 6 वर्षांपासून आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहे. रविवारी या सत्या भाईचा वाढदिवस होता. आपल्या भाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे काही समर्थक कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमा झाले. 

उत्साहाच्या भरात या तरुणांनी तिथेच फटाक्यांची मोठी आतिषबाजी सुरू केली. कारागृह पोलिसांनी त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला असता, या तरुणांनी पोलिसांशीच धक्काबुक्की केली आणि तिथून पसार झाले.

( नक्की वाचा : KDMC News: कल्याण डोंबिवलीत कुत्र्यांच्या निर्बीजीकरणात मोठा झोल; मुदत नसतानाही पालिकेनं उधळले लाखो रुपये! )
 

विशेष म्हणजे, या समर्थकांनी केवळ फटाके फोडले नाहीत, तर या आतिषबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे, अधिकारी विजय गायकवाड आणि त्यांच्या पथकाने तपास चक्रं फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

( नक्की वाचा : Acid Attack: शाळेतून निघाली अन् आयुष्याचं स्वप्न धूसर झालं! संगमनेरमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर ॲसिड हल्ला )
 

या कारवाईत पोलिसांनी रोहित जगदाळे, क्षितिज भगत आणि आकाश खडसे या तिघांना अटक केली आहे. अटकेत असलेला रोहित जगदाळे हा स्वतः एका हत्या प्रकरणात जेलमध्ये होता आणि काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. या तिघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील चौथ्या आरोपीचा पोलीस अजूनही शोध घेत आहेत.

अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी जेल परिसरात धिंड काढली. पुन्हा एकदा अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून जेलबाहेर राडा करण्याची कोणाची हिंमत होऊ नये, यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या आरोपींवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली आहे. 'भाई'ची दहशत दाखवणाऱ्या समर्थकांना आता जेलची हवा खावी लागत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com