
Nagpur News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख आणि वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांनी सलग सहाव्या वर्षी भौतिकशास्त्र (Physics) विषयातील जगातील 'टॉप 2%' शास्त्रज्ञांच्या यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या (Stanford University) संशोधकांनी संकलित केलेल्या आणि एल्सेहियर (Elsevier) द्वारे प्रकाशित केलेल्या या प्रतिष्ठित यादीत डॉ. ढोबळे यांनी 2020, 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 या सलग सहा वर्षांपासून स्थान मिळवले आहे. नागपूर शहरातील ते एकमेव शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी हा बहुमान प्राप्त केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा गौरव वाढवत विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे.
संशोधन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदान
- डॉ. संजय ढोबळे यांचे संशोधन क्षेत्रातील योगदान अत्यंत मोठे आहे.
- त्यांचे स्कोपीसमध्ये (Scopus) आतापर्यंत एकूण 1037 रिसर्च पेपर्स प्रकाशित झाले आहेत.
- त्यांचे स्कोपीस साइटेशन 16,394 असून एच-इंडेक्स (h-index) 51 आहे.
- गुगल स्कॉलरवर त्यांचे साइटेशन 19,847 असून एच-इंडेक्स 520 आहे.
- त्यांच्या नावावर एकूण 122 पेटंट्स असून त्यापैकी 81 पेटंट्सना मान्यता मिळाली आहे.
सर्वाधिक पेटंट्स मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सुरेश भट सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. याव्यतिरिक्त, डॉ. ढोबळे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 33 पुस्तके प्रकाशित केली आहेत. यापूर्वी, सन 2018 मध्ये दिल्ली येथील तीन मूर्ती भवन येथे त्यांना 'इंडिया टॉप फॅकल्टी रिसर्च अवॉर्ड' मिळाला होता.
( नक्की वाचा : Gmail ते Zoho Mail : अमित शाहांप्रमाणे तुम्हालाही ई मेल स्विच करायचा आहे? फॉलो करा या सोप्या Step )
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची प्रेरणा
डॉ. ढोबळे केवळ स्वतःच संशोधन करत नाहीत, तर ते विद्यार्थ्यांनाही संशोधनासाठी प्रेरित करत आहेत. नुकतेच, त्यांनी M.Sc. भौतिकशास्त्राच्या 12 विद्यार्थ्यांकडून 18 पेटंट्सना मान्यता प्राप्त करून घेतली, ज्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत संशोधन पोहोचविण्यात त्यांना मोठे यश मिळाले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यापीठात संशोधन करण्याला प्रोत्साहन मिळत आहे.
मागील एका महिन्यातच त्यांचे तीन रिसर्च पेपर्स 'नेचर' (Nature) या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. 'ल्युमिनिसेंस' (Luminescence) या विषयावर त्यांनी केलेल्या या संशोधनामुळे विद्यापीठाच्या लौकिकात भर पडली आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
डॉ. ढोबळे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे (भा.प्र.से.), प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world