विशाल पुजारी, कोल्हापूर
कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात आज मोठी दुर्घटना घडली. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशात पुराच्या पाण्यातून जाताना बस्तवाड येथे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्कीवाट-बस्तवाड मार्गावर सातजण केळी आणण्यासाठी निघाले होते. याच मार्गावर अकिवाट गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काहीजण आले होते. दरम्यान केळी आणण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर पलटी झाला. यातील सातजण पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागले. यावेळी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
बुडालेल्या सात जणांपैकी तिघेजण पोहत आले तर दोघांना वाचवण्यात आलं. मात्र बचाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक जण बुडालेल्या पैकी दोघेजण यात वाहून गेले. एकाचा मृतदेह सापडला असून दोघेजण बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथक, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बुडालेल्यांचा तपास सुरू केला. दुपारपर्यंत एक मृतदेह सापडला. तर दोघांचा अद्याप तपास सुरू आहे.
अक्कीवाट आणि बस्तवाड मार्गावर पुराचे पाणी आलं आहे. शिरूर तालुक्यात पुरामुळे अनेकांचं हाल होत आहेत. अशातच ही मोठी दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. अक्कीवाटचे महिला सरपंच यांची पती सुहास पाटील यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ही घटना समजल्यानंतर परिसरात नागरिकांची गर्दी जमली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृत्यू झालेल्या सुहास पाटील यांच्याबाबत माहिती घेतली. बेपत्ता असणाऱ्या दोघांचा शोध सुरु आहे. पालकमंत् हसन मुश्रीफ यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यातं आश्वासन दिलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world