समाधान कांबळे, प्रतिनिधी
Hingoli News : हिंगोलीच्या वसमत येथील एका इलेक्ट्रिकल दुकानदाराला तब्बल 23 कोटी रुपयांच्या जीएसटीची नोटीस प्राप्त झाली आहे. वसमत शहरातील राजेश दुमाने यांचं इलेक्ट्रिकच दुकान आहे. त्या दुकानावर इलेक्ट्रिक साहित्याची खरेदी विक्री होते. दिवसाला साधारण दीड ते दोन हजार रुपये त्यांची कमाई आहे. मात्र याच इलेक्ट्रिक दुकानदाराला तब्बल 23 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस पाठवण्यात आली आहे. ही नोटीस पाहून राजेश यांचे डोळेच पांढरे झाले.
आधार आणि पॅन कार्ड वापरून तब्बल 105 कोटी रुपयांचा व्यवहार
इलेक्ट्रिक दुकानाचा मोठा व्यवहार नसताना देखील कोट्यवधी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाल्यानंतर दुकानदाराने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत या संदर्भात माहिती दिली. हिंगोली पोलिसांनी यासंदर्भात माहिती घेतली असता तेलंगणातील एका आरोपीने वसमत येथील इलेक्ट्रिक दुकानदार यांचे आधार आणि पॅन कार्ड वापरून तब्बल 105 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे आणि त्यानुसार या दुकानदाराला 23 कोटी जीएसटी नोटीस आल्याचे स्पष्ट झाल आहे. या संदर्भात वसमत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वसमत पोलीस करत आहेत.
त्यामुळे नागरिकांनी आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड अधिक सांभाळून वापरणं आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीला आपल्याकडील महत्त्वाची कागदपत्रं देऊ नये.