संजय तिवारी, प्रतिनिधी
Vidarbha farmer's cotton export abroad : शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विदर्भातील जवळपास एक हजार शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी इतिहास घडवला. शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या कंपनीमुळे शेतकऱ्यांच्या खिशात थेट नफा आला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी (Vidarbha farmer's cotton) कापसाच्या तीन हजार गाठी परदेशात पाठविल्या आहेत. वरोऱ्याच्या शेतकऱ्यांनी तब्बल 3 हजार गाठी परदेशात निर्यात केल्या आहेत. कापूस शेतकऱ्यांनी चीन आणि व्हिएतनाम येथे नवीन बाजारपेठ शोधली आहे. विदर्भातल्या काही कापूस उत्पादकांनी आपल्या कामाच्या पद्धतीत बदल केला आणि मोठा सकारात्मक बदल घडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
थेट विदेशात कापूस गेल्यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 250 रुपये ज्यादा मिळाले आहेत. देशातील कोरडवाहू शेतकऱ्यांचं हे पहिलं उदाहरण असल्याचं सांगितलं जात आहे. वरोऱ्याच्या 948 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन याचा फायदा घेतला. फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून या शेतकऱ्यांनी स्वतःच बाजारपेठ शोधली. यानिमित्ताने वरोऱ्याच्या शेतकऱ्यांनी कापूस शेतकऱ्यांना नवी दिशा दाखवली. कापूस घरात ठेवणे किंवा पडेल भावात विकण्याऐवजी शेतकऱ्यांकडूनच आता नवीन रणनीती आखली जात आहे. शेतकऱ्यांनी कापसाच्या गाठी तयार करून गोदामात ठेवल्या आहेत. या नव्या प्रक्रियेचा नफा थेट शेतकऱ्यांच्या खिशात मिळत आहे. सध्या शेतकरी उत्पादक कंपनीत ९४८ शेतकरी आहेत. त्यांची प्रति क्विंटल २५० रुपये नफा झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत कापसाला बाजारात जो भाव मिळेल त्यातच विकावा लागत होता. मात्र आता थेट परदेशात का कापूस विकला जात असल्यानं शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा मिळत आहे.
वरोरा येथील युवा प्रगतिशील शेतकरी बालाजी धोबे यांच्या नेतृत्वात कापूस, सोयाबीन, चणा, डाळ उत्पादक शेतकऱ्यांनी कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी उभारली आणि त्याद्वारे मुख्यतः कोरडवाहू शेतीच्या शेतकऱ्यांसाठी मिळवलेले हे यश कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नवीन दिशा देणारे ठरेल, असा विश्वास विदर्भात व्यक्त केला जात आहे.
नक्की वाचा - Satara News : पाचगणीत आढळले पांढरे सांबर; सह्याद्रीतील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन
गेली दोन अडीच दशके विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या चर्चेत असताना आता काही कोरडवाहू शेतीच्या शेतकऱ्यांनी आपला कापूस विदेशात पाठवण्यात यश मिळवले आहे. देशात कोरडवाहू शेतीतील शेतकऱ्यांना अशा रीतीचे मिळालेले हे पहिले यशस्वी उदाहरण असल्याचा दावा देखील केला जात आहे. याद्वारे दलालांना बाजूला सारून कापूस शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग गवसला आहे असे म्हणता येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world