Gadchiroli Naxal Encounter: गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी अबुझमाडच्या घनदाट जंगलात सलग तीन दिवस राबविलेल्या विशेष अभियानात 7 जहाल माओवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांवर सरकारने एकूण 71 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या कारवाईमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असला तरी, माओवाद्यांशी लढताना गडचिरोली पोलीस दलातील जवान दीपक चिन्ना मडावी यांना वीरगती प्राप्त झाली असून एक जवान जखमी झाला आहे.
माओवाद्यांचा मोठा कट उधळला
गडचिरोली आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात माओवाद्यांची कंपनी क्रमांक 10 आणि छत्तीसगडमधील इतर दलमचे सदस्य एकत्र येऊन मोठ्या घातपाताच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस दलाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सी-60 पथकाच्या 14 तुकड्या 3 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच या मोहिमेसाठी रवाना झाल्या होत्या. अत्यंत कठीण आणि दुर्गम अशा डोंगरदऱ्यांचा प्रवास करत जवान माओवाद्यांच्या अड्ड्यापर्यंत पोहोचले.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death :बॉम्ब,कट, अपघात की घातपात? अजित पवारांच्या मृत्यूभोवतीच्या 7 मोठ्या शंका; उत्तरं कधी मिळणार? )
तीन दिवसांचा थरार आणि चकमक
4 फेब्रुवारी रोजी शोध मोहीम सुरू असताना दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त झाले. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या तुकड्यांनाही मदतीला बोलावण्यात आले.
या दिवशी झालेल्या जोरदार चकमकीत 3 जहाल माओवाद्यांचे मृतदेह हाती लागले. हे अभियान तिथेच न थांबवता पुढे सुरू ठेवण्यात आले आणि 6 फेब्रुवारी रोजी पुन्हा झालेल्या चकमकीत आणखी 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. अशा प्रकारे तीन दिवस आणि तीन रात्री चाललेल्या या थरारक मोहिमेत एकूण 7 माओवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.
( नक्की वाचा : 'एक हसीना थी, एक दीवाना था'..हनिमूनहून परतताच पत्नीचा खळबळजनक कारनामा; चित्रपटालाही मागे टाकेल असा शेवट! )
जवान दीपक मडावी यांना वीरगती
या घनघोर लढाईत पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले आहे. 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबारात विशेष पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जंगलातून बाहेर काढून भामरागड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दीपक मडावी यांना गडचिरोली पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. या मोहिमेत जोगा मडावी हे आणखी एक जवान जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत.
25 लाखांचा बक्षीस पात्र प्रभाकर ठार
मारल्या गेलेल्या सातही माओवाद्यांची ओळख पटली असून, त्यातील मुख्य म्होरक्या प्रभाकर ऊर्फ रवी याच्यावर एकट्यावर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. तो गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी आणि कंपनी क्रमांक 10 चा प्रमुख होता. त्याच्यावर तब्बल 113 गुन्हे दाखल होते.
त्यासोबतच 16 लाख रुपयांचे बक्षीस असलेला कमांडर पागु मोडयाम, 8 लाख रुपयांचे बक्षीस असलेली अनिला कोवाची, कामेश पदा, तसेच भजनाथ होळी, मंगली कुरसाम आणि जोगी सोढी-मडावी यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. या सर्वांवर महाराष्ट्र शासनाने एकूण 71 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
घटनेच्या ठिकाणाहून पोलिसांनी 3 एके-47 रायफल, 1 एसएलआर, 1 .303 रायफल अशी एकूण 5 अत्याधुनिक अग्निशस्त्रे जप्त केली आहेत. याव्यतिरिक्त 173 जिवंत काडतूस, 3 बीजीएल, 7 मॅगझिन, कॉर्टेक्स वायर आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कारवाईचे कौतुक करतानाच, उर्वरित माओवाद्यांनी हिंसाचार सोडून आत्मसमर्पण करावे आणि मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन केले आहे.