मनीष रक्षमवार, गडचिरोली
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका युवकाला उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस उपअधीक्षक पदाचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी रुपयांना फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्ञानेश्वर वारे या आरोपीला गडचिरोली पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांशी ओळख असल्याचे भासवून आरोपीने दोन वर्षांत ही रक्कम उकळली होती.
कशी केली फसवणूक?
गडचिरोली येथील एक युवक पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. याच दरम्यान त्याची ओळख ज्ञानेश्वर वारे याच्याशी झाली. वारेने आपण वरिष्ठ सनदी अधिकारी आणि मोठ्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात असल्याचे भासवून युवकाचा विश्वास संपादन केला. उपजिल्हाधिकारी (Dy. Collector) किंवा पोलीस उपअधीक्षक (DySP) बनवून देण्याचे स्वप्न त्याने युवकाला दाखवले.
(नक्की वाचा- Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)
या नोकरीसाठी गेल्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने युवकाकडून तब्बल 2 कोटी रुपये उकळले गेले. दोन वर्षे उलटूनही नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने 19 एप्रिल रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांचा 'सिनेस्टाईल' पाठलाग
तक्रार दाखल झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचे लोकेशन शोधले, तो सुरुवातीला मुंबईत असल्याचे समजले. पोलिसांच्या हालचालींची चाहूल लागताच वारेने मुंबईतून पुण्याकडे पलायन केले. गडचिरोली पोलिसांचे पथक तत्काळ पुण्याला रवाना झाले. पोलिसांनी पुण्यात सापळा रचून मोठ्या शिताफिने आरोपी ज्ञानेश्वर वारे याला अटक केली.
(नक्की वाचा- Pune News: रिंग रोडसाठी शेतकरी कुटुंबाला रस्त्यावर आणलं; डोळ्यासमोर संसार उद्ध्वस्त)
गडचिरोली पोलिसांची दमदार कामगिरी
गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपी टोळीने काम करतो का? याचा देखील तपास केला जात आहे. अनेकदा वशिलेबाजीच्या नावाखाली स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांची फसवणूक केली जाते. मात्र उमेदवारांनी अधिकृत मार्गानेच प्रयत्न करावेत जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world