- मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत
- काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची स्थानिक पातळीवर आघाडी
- मीरा-भाईंदर विकास आघाडीची स्थापना
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागून एक आठवडा उलटल्यानंतर आता शहरात नव्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपला ताकदीने विरोध करता यावा यासाठी आता काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र आली आहे. या दोन्ही पक्षांनी मिळून 'मीरा-भाईंदर विकास आघाडी' (Mira Bhayander Vikas Aghadi) स्थापन केली असून, कोकण विभागीय आयुक्तांकडे याची अधिकृत नोंदणीही करण्यात आली आहे.
नक्की वाचा: Mumbai BMC Mayor Election: महापौर कोण आणि कोणाचा ? आज कळणार
भाजपकडे स्पष्ट बहुमत, काँग्रेस आणि शिवसेना विरोधी पक्षात
महानगरपालिकेच्या एकूण 95 जागांपैकी भाजपला 78 जागांसह निर्भेळ यश मिळाले आहे. दुसरीकडे, काँग्रेसला 13 आणि शिंदे सेनेला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत, मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत एक अपक्ष उमेदवार निवडून आला असून तो देखील भाजपसोबत गेल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने, महापौरपद, उपमहापौरपदासह विविध समित्यांची अध्यक्षपदे ही भाजपकडेच राहणार आहेत. महापालिकेच्या सभागृहात भाजपसमोर कणखरपणे विरोध करता यावा यासाठी एकत्र यावे ही गरज काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वाटू लागली होती. त्यातूनच ही आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक नेत्यांची सावध भूमिका
स्थानिक पातळीवरचा निर्णय या युतीबाबत बोलताना दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. ही कोणतीही राजकीय युती नसून केवळ स्थानिक नगरसेवकांनी घेतलेला निर्णय असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसेन यांनी 'टीओआय'शी स्पष्ट केले की, ही केवळ महापालिकेतील कामकाजासाठी केलेली व्यवस्था आहे. शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनीही हा निर्णय स्थानिक पातळीवरचा असल्याचे म्हटले आहे. या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे जय ठाकूर करणार आहेत.
नक्की वाचा: MIM नगरसेविका सहर शेख आणि युनूस शेख एकनाथ शिंदेंना भेटणार, तो VIDEO झाला होता व्हायरल
पुण्यात सेना-राष्ट्रवादीच्या 'महायुती'च्या चर्चेने खळबळ
दुसरीकडे, बार्शीचे शिवसेना (ठाकरे गट) नेते, माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो एकत्र वापरून सर्व गट एकत्र आल्याचे सांगण्यात आले आहे. बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सोडून इतर सगळे पक्ष एकत्र आल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळेजण एकत्र येऊन भाजपविरोधात इथे निवडणूक लढत असल्याचे सोपल यांच्या पोस्टद्वारे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी "उद्धव ठाकरे असा कोणताही निर्णय घेणार नाहीत," असे सांगत अशी कोणतीही युती झाली नसल्याचे सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world