अभिषेक भटपल्लीवार, भंडारा
Bhandara News: नियतीचा खेळ कधी कोणासोबत कसा असेल, याचा नेम नसतो. एकीकडे वडिलांच्या निधनामुळे घरात आणि गावात शोककळा पसरलेली असताना, दुसरीकडे आपल्या भविष्याची निर्णायक परीक्षा देणारी एक मुलगी. ही हृदयस्पर्शी कहाणी आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आंबागड येथील जान्हवी हौशीलाल राहांगडाले हिची. वडिलांचे पार्थिव घरात शांत पडलेले असताना जान्हवीने धैर्याने बारावीचा इंग्रजीचा पेपर देऊन आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली.
अपघाताने कोसळले आभाळ
जान्हवीचे वडील हौशीलाल राहांगडाले हे सोमवारी दुपारी सायकलने घरी परतत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जान्हवीच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता.
अश्रूंना आवर आणि स्वप्नांना आधार
मंगळवारी, 10 फेब्रुवारी रोजी बारावी बोर्ड परीक्षेचा पहिला इंग्रजीचा पेपर होता. घरात वडिलांचे पार्थिव अंत्यसंस्काराची वाट पाहत होते. अशा स्थितीत कोणतीही सामान्य व्यक्ती कोलमडून गेली असती, पण जान्हवीने आपल्या वडिलांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले.
(नक्की वाचा- Pune News: पुणेकरांना रस्त्याने ये-जा करत 50 हजार रुपये कमाईची संधी! काय करावं लागेल?)
वडिलांच स्वप्न करायचंय
डोळ्यांत साचलेले अश्रू आणि मनात वडिलांच्या आठवणींचे काहूर असतानाही जान्हवी सकाळी 10 वाजता आपल्या मामाच्या मुलासोबत जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथील परीक्षा केंद्रावर पोहोचली. आयुष्याच्या वळणावर पितृछत्र हरवल्यानंतरही तिने अत्यंत शांतपणे आपला इंग्रजीचा पेपर लिहिला. मुलगी शिकून मोठी व्हावी, वडिलांचं हे स्वप्न तिला पूर्ण करायचे आहे.
(नक्की वाचा- Sunetra Pawar in Delhi: NCP च्या विलीनीकरणाचा आज फैसला? सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात 4 मुद्द्यांवर चर्चा)
परीक्षा केंद्रावरील शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी तिचे सांत्वन केले आणि तिच्या धैर्याचे कौतुक केले. वडिलांच्या निधनाचे अतीव दु:ख पचवून परीक्षेला सामोरे जाणे हे केवळ जान्हवीच करू शकते, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world