जाहिरात

Kolhapur News: 'गोकुळ'संबंधित दूध संघांना नोटिसा बजावणे भोवलं; अधिकाऱ्याची 15 दिवसात गच्छंती

Gokul Dairy Politics: कोल्हापूरच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या 'गोकुळ' दूध संघाशी संबंधित दूध संस्थांना नोटिसा बजावणाऱ्या सहायक निबंधक सुजय कदम यांची अवघ्या 15 दिवसांत तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

Kolhapur News:  'गोकुळ'संबंधित दूध संघांना नोटिसा बजावणे भोवलं; अधिकाऱ्याची 15 दिवसात गच्छंती

विशाल पुजारी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'गोकुळ' दूध संघाच्या राजकारणाने आता प्रशासकीय स्तरावर वेगळे वळण घेतले आहे. दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया सुरू करणाऱ्या सहायक निबंधक (दुग्ध) सुजय कदम यांची अवघ्या 15 दिवसांच्या आत बदली करण्यात आली आहे. सहकार विभागाने घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

बदलीचा आदेश आणि नवी नियुक्ती

शासनाच्या सहकार विभागाचे उपसचिव नितीन गायकवाड यांनी रात्री उशिरा हे बदलीचे आदेश काढले. सुजय कदम यांना तातडीने कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या जागी शाहूवाडी येथील सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांची वर्णी लागली आहे. ठाकरे यांना तात्काळ पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(नक्की वाचा-  VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?)

राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी 

गोकुळशी संलग्न असलेल्या दूध संस्थांची मतदार यादी दुग्ध विभागाकडे सादर केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. या प्रक्रियेवरून जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचे बोलले जाते. 1 एप्रिल रोजी प्रदीप मालगावे यांची बदली होऊन सुजय कदम आले होते. आता 15 दिवसांत कदम यांचीही उचलबांगडी झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवर राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे.

(नक्की वाचा-  LPG Prices: एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढणार? पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होणार? सद्यस्थिती काय?)

सुनावणी प्रक्रियेचे काय होणार?

सुजय कदम यांनी पदभार स्वीकारताच दूध संस्थांच्या सुनावणीची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू केली होती. अनेक संस्थांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. आता कदम यांची बदली झाल्याने या सुनावणी प्रक्रियेला ब्रेक लागणार की नवे अधिकारी तीच गती कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com