विशाल पुजारी, प्रतिनिधी
Gokul Milk: कोल्हापुरातील दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य संस्था असलेल्या गोकुळ दूध संघाने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसेल असा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणारा खर्च आणि इतर तांत्रिक कारणांमुळे गोकुळने आपल्या दूध विक्री दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ ठराविक प्रकारच्या दुधासाठीच लागू असणार आहे.
गाईचे दूध महागणार
गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध विक्री दरामध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय अधिकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमधील गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वाढत्या खर्चाचा विचार करून गाईच्या दुधाचे दर वाढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
कधीपासून लागू होणार नवे दर?
गोकुळने घेतलेला हा निर्णय येत्या 21 मे पासून लागू होणार आहे. ही दरवाढ केवळ एका मर्यादित क्षेत्रासाठी नसून कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि कोकण विभागातील सर्व शहरांमध्ये लागू केली जाणार आहे. त्यामुळे 21 मे नंतर या सर्व भागातील ग्राहकांना गाईच्या दुधासाठी जादा पैसे मोजावे लागतील.
( नक्की वाचा : Akola News : Blinkit नं पाठवली एक्स्पायर झालेली मटकी! अकोल्यात ऑनलाईन अन्नाच्या विक्रीतून दिलं जातंय विष? )
म्हशीचे दूध पिणाऱ्यांना दिलासा
गाईच्या दुधाचे दर वाढले असले तरी म्हैस दूध पिणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गोकुळने म्हैस दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. वाढत्या महागाईच्या काळात ग्राहकांवरील आर्थिक ताण मर्यादित ठेवण्यासाठी संघाने हा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
दरवाढीमागे नेमकी कारणे काय?
गोकुळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुधाच्या उत्पादनापासून ते वितरणापर्यंतचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये प्रामुख्याने वाढते इंधन दर, कच्च्या मालाच्या किमती, वाहतूक खर्च आणि पॅकेजिंगसाठी लागणारा खर्च या सर्व गोष्टींचा समावेश आहे. हा वाढता खर्च भरून काढण्यासाठी दूध दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अमूलनेही आधीच वाढवलेत दर
गोकुळच्या या निर्णयाआधी अमूलने देखील आपल्या दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. अमूलची ही प्रतिलिटर 2 रुपयांची दरवाढ 14 मे पासून संपूर्ण देशभरात लागू झाली आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने घेतलेल्या या निर्णयानुसार अमूल गोल्ड, अमूल ताझा, अमूल शक्ती, टी-स्पेशल आणि स्लिम अँड ट्रिम या सर्व प्रकारच्या दुधावर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world