
सरकारी कार्यालयामध्ये कामाच्या वेळेतही अनेक ठिकाणी वैयक्तिक समारंभ झाडले जात होते. मग त्यात कुणाचा वाढदिवस असेल किंवा अन्य काही गोष्टी. कार्यालयीन वेळेत कार्यालयातच असे वैयक्तिक कार्यक्रम साजरे केले जात होते. त्यावर कुणाचेही नियंत्रण नव्हते. शिवाय कुणाची भितीही नव्हती. त्यामुळे असे कार्यक्रम दिवसआड सर्रास पण होत होते. याचा थेट परिणाम मात्र सरकारी कामावर होत होता. लोकांची गैरसोय होत होती. याची गंभीर दखल आता सरकारने घेतली आहे. अशी समारंभ कार्यालयीन वेळेत घेतल्यास त्या कर्मचाऱ्यांची आता खैर असणार नाही.
याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाकडून काढण्यात आले आहे. त्यात स्पष्ट पणे म्हणण्यात आले आहे की विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी हे शासकीय कार्यालयात, कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक रामारंभ उदाहरणार्थ वाढदिवस साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे कार्यालयीन कामाचा वेळ वाया जात आहे. शिवाय कार्यालयात कामानिमित्त आलेल्या अभ्यागत, नागरिक यांना त्यांचे कामासाठी तिष्ठत राहावे लागत आहे. अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करणेची बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम नुसार उचित नाही. असं या परिपत्रकात म्हटलं आहे.
त्यामुळे याद्वारे निर्देश देण्यात येतात की, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख पुणे यांचे कार्यालय तसेच, या अंतर्गत येणारी सर्व कार्यालय यांच्यामध्ये यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत साजरे करू नयेत. तसे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. या आदेशानंतर ही जर कार्यालयीन वेळेत असे समारंभ कोणी करत असेल, असे निदर्शनास आल्यास त्यांना तातडीने समज देवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देस या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. जमावबंदी आयुक्त आणि संचालक डॉ सुहास दिवसे यांनी ही परिपत्रक काढले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world