यशपाल सोनकांबळे, पुणे:
Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir News: 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर पार पडली. या कुस्तीस्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर सोलापूरचा बलाढ्य मल्ल महेंद्र गायकवाडवर मात करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. एकाच गुरुचे शिष्य आमनेसामने आल्याने या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या रोमहर्षक लढतीत हर्षवर्धन सदगीर विजय मिळवत महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. या विजयानंतर हर्षवर्धनने निवृत्तीची घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला. नेमकं काय म्हणाला हर्षवर्धन सलगर वाचा...
आता मला नोकरीची गरज नाही.. हर्षवर्धनने खंत बोलून दाखवली
68 व्या महाराष्ट्र केसरीचे मैदान मारत हर्षवर्धन सदगीर याने डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. या विजयानंतर बोलताना हर्षवर्धनने आपल्याला गरज असतानाही सरकारी नोकरी दिली नसल्याची खंत बोलून दाखवली. "2020 मध्ये महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर मला नोकरीची गरज होती, मी नोकरी मागितली होती. त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब, दादा भुसेंची भेटही घेतली, मात्र मला नोकरी दिली नाही, आता मला नोकरी नको." असं तो म्हणाला.
तसेच "त्यावेळी मला पैलवान म्हणून देखील गृहीत धरलं नाही, काही लोकांनी मला पैलवान नाही म्हणून जमा केलं होते. तेव्हा मला मागूनही नोकरी दिली नाही, आता मला नोकरीची गरज नाही. गेली सात महिने मी पंबाजमध्ये कुस्ती शिकत होतो, काका पवार यांचे मार्गदर्शन घेतले मला स्वतःला सिद्ध करायचं होतं, आज करून दाखवले. यापुढे मी मॅटवरील कुस्ती खेळणार नाही, मी स्वखुशीने मॅटवरील कुस्तीमधून निवृत्ती घेत आहे," असं तो म्हणाला.
5 लाख अन् फॉर्च्युनरचा मानकरी..
दरम्यान, महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर दोघेही ताकदीचे मल्ल असल्याने या कुस्तीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहिली फेरी 1 - 1 अशी बरोबरीत झाली. दुसऱ्या फेरीत महेंद्र गायकवाडने आघाडी घेतली, मात्र अखेरच्या क्षणात हर्षवर्धनने दमदार पलटवार करत गुण मिळवले, त्यासोबतच हर्षवर्धनने 4-2 अशी आघाडी घेत कुस्ती जिंकली. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला ५ लाख रुपये रोख पारितोषिक आणि फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून देण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world