नामवंत अभिनेते अशी ओळख असणारे सयाजी शिंदे यांची तब्येत बिघडली आहे. छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. साताऱ्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याची महिती समोर येत आहे. गुरुवारी ११ एप्रिल रोजी त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे काही तपासण्या करण्यात आल्या. त्यात त्यांच्या हृदयाच्या एका रक्त वाहिनीमध्ये ब्लॉक असल्यामुळे तत्काळ अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टर सोमनाथ साबळे यांनी माहिती दिली.
काय म्हणाले डॉक्टर ?
डॉक्टरांनी माध्यमांना सयाजी शिंदेंच्या आरोग्याबाबत महिती देत असताना सांगितलं की, "काही दिवसांपूर्वी सयाजी शिंदे यांना छातीमध्ये थोडासा डिसकम्फर्ट जाणवत होता. त्यामुळे त्यांनी रुटीन चेकअप करुन घेतले. त्यांची 2D Eco Cardiography जेव्हा आम्ही केली तेव्हा आम्हाला जाणवलं की, त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल कमी आहे. तेव्हा त्यांच्या ह्यदयाच्या तीन रक्त वाहिन्यांपैकी दोन रक्त वाहिन्या नॉर्मल होत्या आणि एका रक्त वाहिनीमध्ये 99 टक्के ब्लॉक अढळला होता. आम्ही त्यांची अँजिओप्लास्टी केली आहे. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे."
कोण आहेत सयाजी शिंदे ?
सयाजी शिंदे मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी-हिंदीसह कन्नड, तामिळ, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी सिने-निर्मितीही केली आहे. सयाजी शिंदे अभिनेते असण्यासोबत वृक्षप्रेमीदेखील आहेत. त्यांचा घर बंदूक बिरयानी हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शीत झाला आहे. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. सयाजी शिंदे यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सयाजी शिंदे एक निसर्ग नायक!
सयाजी शिंदे हे सामाजिक कार्यामुळे देखील चर्चेत असतात. ते गेल्या अनेक वर्षांपासून 'सह्याद्री देवराई'संस्थेच्या माध्यमातून राज्यभर वृक्षारोपणाचे काम करत आहेत. ते कायमच झाडांच्या संवर्धनासाठी आणि वृक्षारोपण करण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे त्यांनी हाती घेतलेलं काम लोकचळवळीचे रुपांतर घेत आहे. राज्यभरात आतापर्यंत साधारण 22 देवराई, एक वृक्ष बँक, 14 गडकिल्ले व राज्यात अन्य ठिकाणी चार लाखांपेक्षा अधिक वृक्षांचे रोपण केले आहे. भविष्यातही गावोगावी सह्याद्री देवराई अशाच बहरतील आणि पडद्यावरचा एक नायक निसर्गरक्षक महानायक म्हणून आपल्या मनावर राज्य करेल.