जाहिरात

Maharashtra Heatwave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होणार; हे 15 जिल्हे अतिजोखमीचे, नागरिकांना इशारा

उष्णतेच्या लाटेमध्ये उष्माघात म्हणजेच Heatstrokeचा धोका असतो. हा उष्माघात जीवघेणाही ठरू शकतो. महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे, हे लक्षात ठेवूनच घराबाहेर पडा. 

Maharashtra Heatwave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होणार; हे 15 जिल्हे अतिजोखमीचे, नागरिकांना इशारा

Maharashtra Heatwave : यंदा ऊन जरा जास्तच आहे, असं दरवर्षी वाटत असलं तरी यावर्षीचं ऊन रेकॉर्डब्रेक असणार आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा चाळीशीपार गेला आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत पारा आणखी वर जाण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ होणार आहे. तर कोकणपट्ट्यातल्या काही भागांत उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज आहे.  

गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ झाली आहे. सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये  उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट' देण्यात आला आहे.  पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गलाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

कुठे, किती कमाल तापमान? 

अकोला
44

वर्धा
43.1

अमरावती
43.2

यवतमाळ
43.2

सोलापूर
42.5

वाशिम
42.6

परभणी
42.2

जळगाव
42.1

गडचिरोली
42

मालेगाव
42

बुलढाणा
41.5

नागपूर
41.4

संभाजीनगर
41.2

बीड
40.7

गोंदिया
40.5

धाराशिव
40.3

सातारा
40.3

सांगली
38.8

नाशिक
38.5

कोल्हापूर
37.1

मुंबई
32.8

अकोला ४४ अंशांवर तळपला; उष्णतेची लाट तीव्र होण्याचा इशारा..

अकोला शहरात उष्णतेचा कहर वाढत असून आज तापमानाने ४४ अंश सेल्सियसचा उच्चांक गाठला आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत तापमानात तब्बल ५ अंशांनी वाढ झाली आहे. शनिवारी ४२, रविवारी ४३.१ आणि सोमवारी ४३.८ अंशांवर असलेला पारा आज आणखी वाढला. तर दुसरीकडे प्रखर उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या घटली आहे. हवामान विभागाने १६ तारखेपासून उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आरोग्य प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातले 15 जिल्हे अतिजोखमीचे


धोक्याचा इशारा म्हणजे अनेक शहरांमध्ये पारा ४५ अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसतोय. त्यामुळे घराबाहेर काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. या कामगारांना तीव्र उष्णतेपासून वाचवण्यासाठी राज्य सरकारने नवा नियम तयार केला आहे. या नियमांनुसार ऑरेंज आणि रेड हिट अलर्टच्या काळात दुपारी 12 ते 4 या वेळेत कामगारांना विश्रांती देणं बंधनकारक असेल. तसंच कामाची वेळ सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 अशी ठेवावी लागेल. राज्याच्या हिट अ‍ॅक्शन प्लॅन अंतर्गत विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातले 15 जिल्हे अतिजोखमीचे ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रामध्ये जे कामगार दुपारी उन्हात काम करतात, त्यांच्यासाठी दिलासा म्हणून काही नियम ठरवण्यात आलेत. उन्हात काम करणाऱ्यांना दुपारी 12 ते 4 विश्रांती अनिवार्य करण्यात आली आहे. कामाची वेळ सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 अशी असेल. दुपारी नागरिकांना थंडावा मिळण्यासाठी उद्यानं, बागा खुल्या ठेवल्या जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा वाढवण्यावरही भर दिला जाईल. नागरिकांना ओआरएस आणि इलेक्ट्रॉलाइट वाटलं जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या सावलीची व्यवस्था केली जाणार आहे. 

तुम्हीसुद्धा उन्हात बाहेर पडत असाल, उन्हामध्ये ऑफिसला जात असाल तर स्वतःची काळजी घ्या...
 

  • भरपूर पाणी प्या
  • तहान लागलेली नसली तरीही पाणी प्या
  • लिंबू पाणी, ताक किंवा ओआरएस सतत पीत राहा 
  • बाहेर पडताना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा
  • उन्हाळ्यात सुती कपडे वापरा 

उष्णतेच्या लाटेमध्ये उष्माघात म्हणजेच Heatstrokeचा धोका असतो. हा उष्माघात जीवघेणाही ठरू शकतो. महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे, हे लक्षात ठेवूनच घराबाहेर पडा. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com