जाहिरात

Hindi language Row पहिलीपासून हिंदीचा फायदा काय? राज्य सरकारच्या आदेश काय सांगतो? पालकांनो नक्की वाचा

"मुलांना शिकवताना आपण केवळ भाषा शिकवत नाही, तर त्यांच्या विचारप्रक्रियेचा पायाही घडवत असतो." भाषा हे ज्ञानाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे.

Hindi language Row पहिलीपासून हिंदीचा फायदा काय? राज्य सरकारच्या आदेश काय सांगतो? पालकांनो नक्की वाचा
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:


सचिन उषा विलास जोशी, शिक्षण अभ्यासक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF 2024) या दोन्ही दस्तऐवजांनी पायाभूत स्तरावर मुलांच्या भाषिक विकासाला महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे. याच दृष्टीने, महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा (R3) म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे विश्लेषण करताना केवळ धोरणात्मक बाजूंचाच नव्हे, तर बालकांच्या मेंदू विकासाच्या वैज्ञानिक आधारांचा विचार करणे अत्यावश्यक आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भाषा शिक्षणातील मूलभूत संकल्पना – L1, R1, R2 आणि R3

शैक्षणिक धोरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संकेतानुसार, L1 म्हणजे बालकाची मातृभाषा किंवा घरची भाषा, जी त्याला सहज आकलन होते. याच भाषेचा उपयोग R1 म्हणून केला जातो आणि या भाषेतच मुले वाचन आणि लेखन शिकण्यास सुरुवात करतात. R2 म्हणजे दुसरी भाषा, जी या वयात मुलांना केवळ मौखिक स्वरूपात समजावून सांगितली जाते. R3 म्हणजे तिसरी भाषा – उदाहरणार्थ, हिंदी – जी केवळ परिचय आणि मौखिक स्तरावर शिकवण्याची शिफारस केलेली आहे.

मेंदूचा विकास आणि भाषेचे महत्त्व:

युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि हार्वर्ड विद्यापीठातील संशोधन केंद्रांच्या अभ्यासानुसार, बालकाच्या मेंदूचा जवळपास 80% विकास वयाच्या पहिल्या आठ वर्षांत होतो. प्रा. पेट्रीसिया कूल यांच्या भाषासंवेदनविषयक न्यूरोसायन्स संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, "लहान वयात मुलांना जितक्या अधिक भाषांचा अनुभव मिळतो, तितकी त्यांची त्या भाषा शिकण्याची क्षमता नैसर्गिकरित्या विकसित होते." याचा अर्थ, या वयात विविध भाषांचे ध्वनी आणि संपर्क जितका जास्त असेल, तितकी त्या भाषेला स्वीकारण्याची आणि आत्मसात करण्याची क्षमता अधिक दृढ होते. याला linguistics exposure म्हणतात.

( नक्की वाचा : Raj Thackeray: 'आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही', पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला मनसेचा विरोध )

SCF आणि NEP चा  दृष्टिकोन

NEP आणि SCF या दोन्हीमध्ये पायाभूत स्तरावर मुलांनी प्रामुख्याने त्यांची मातृभाषा (L1) किंवा त्यांना समजणाऱ्या भाषेतूनच शिक्षण घ्यावे, यावर जोर देण्यात आला आहे. दुसरी भाषा (R2) आणि तिसरी भाषा (R3) यांचा परिचय केवळ मौखिक स्वरूपात करून द्यावा, असे स्पष्ट निर्देश आहेत. लेखन आणि वाचनाची सुरुवात फक्त R1 मध्येच व्हावी, असेही नमूद आहे. पायाभूत स्तरावरील SCF च्या ३.२ विभागात स्पष्टपणे सांगितले आहे की, बालकांनी किमान दोन भाषांमध्ये – श्रवण, शब्दसंग्रह, आकलन आणि अभिव्यक्ती यांसारखी मौखिक कौशल्ये आत्मसात करावीत. तिसऱ्या भाषेचा वापर मुख्यतः गोष्टी, गाणी, संवाद आणि सर्जनशील खेळांच्या माध्यमातून करावा, असे नमूद आहे.

इयत्ता पहिलीत हिंदी शिकवणे योग्य आहे का?

या प्रश्नाचे उत्तर हो आहे, परंतु ते केवळ मौखिक संपर्काच्या स्वरूपातच अपेक्षित आहे. याचा अर्थ, इयत्ता पहिलीत हिंदी शिकवण्यासाठी कविता, गाणी, गोष्टी आणि संवादांचा वापर करणे योग्य आहे. तथापि, व्याकरण, निबंध, लेखन-वाचन किंवा शुद्धलेखन यांसारख्या औपचारिक पद्धती या स्तरावर टाळल्या पाहिजेत. या औपचारिक प्रक्रियेची सुरुवात इयत्ता तिसरीनंतरच व्हायला हवी.

( नक्की वाचा : Savitribai Phule: सावित्रिबाईंनी 175 वर्षापूर्वी सुरू केलेली शाळा, आज 'या' शाळेची स्थिती काय? )

या निर्णयाचे संभाव्य फायदे

या निर्णयामुळे इतर राज्यांतील मुलांशी संवाद साधणे सोपे होईल, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागेल आणि त्रैभाषिक धोरणाची अंमलबजावणी सुलभ होईल. मुलांच्या लवचिक मेंदूला अधिक भाषांचा अनुभव मिळाल्याने त्यांची भाषिक संवेदनशीलता आणि सांस्कृतिक आकलन क्षमता वाढेल.

थोडक्यात

इयत्ता पहिलीत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवणे NEP आणि SCF च्या धोरणांशी सुसंगत आहे, परंतु त्याची व्याप्ती केवळ मौखिक ओळख आणि संवादापुरती मर्यादित ठेवल्यास. या वयात मेंदूच्या भाषिक विकासासाठी विविध भाषांशी संपर्क साधणे अत्यंत फायदेशीर आहे, मात्र त्यावर लेखन आणि वाचनाचा अतिरिक्त भार नसावा. प्रत्येक भाषेचा अनुभव आनंददायी असावा, तो बोजा वाटू नये. त्यामुळे, शासनाचा निर्णय योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकांचे योग्य प्रशिक्षण, दर्जेदार शैक्षणिक साहित्याची उपलब्धता आणि बालकेंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

"मुलांना शिकवताना आपण केवळ भाषा शिकवत नाही, तर त्यांच्या विचारप्रक्रियेचा पायाही घडवत असतो." भाषा हे ज्ञानाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे आणि ते विश्वास, संवेदनशीलता आणि सुसंवादाने जोडले गेले पाहिजे. L1 किंवा R1 भाषेमध्ये मुलांना स्वतःला व्यक्त करण्याची आणि लिहिण्याची संधी मिळेल, तर तिसऱ्या भाषेचा उपयोग केवळ गाणी आणि गोष्टींच्या माध्यमातून ओळख निर्माण करण्यापुरता मर्यादित राहील. इयत्ता तिसरीच्या पुढील स्तरांवर विद्यार्थी हळूहळू या तिसऱ्या भाषेच्या लेखन आणि वाचनाकडे वळतील.

महाराष्ट्र शासनाचा निर्णय क्रमांक: सांकीर्ण-२०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४, दिनांक 16 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार (GR), हिंदी ही तिसरी भाषा म्हणून इयत्ता १ ली पासून शिकवण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

शासन निर्णयात नमूद केले आहे की, "राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता 1 ली ते 5 वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य असेल."

हा शासन निर्णय त्रैभाषिक धोरणाशी सुसंगत आहे. परंतु, SCF २०२४ मध्ये R3 केवळ मौखिक स्वरूपात शिकवावी, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

GR मध्ये लेखनाच्या स्वरूपाबाबत स्पष्टता नसल्यामुळे शाळा लेखन सुरू करतील की नाही, याबाबत काही प्रमाणात संभ्रम निर्माण होऊ शकतो. तथापि, राज्य पायाभूत स्तरावरील राज्य अभ्यासक्रम आराखड्यात याबाबत स्पष्ट मार्गदर्शन दिलेले असल्याने हा संभ्रम लवकरच दूर होईल, अशी अपेक्षा आहे.

वास्तव:

सध्या महाराष्ट्रातील बहुतेक खाजगी इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेची ओळख इयत्ता पहिल्यापासूनच करून दिली जाते. राज्य मंडळाच्या अधिकृत अभ्यासक्रमात हिंदी इयत्ता पाचवीपासून शिकवण्याची तरतूद असली तरी, अनेक खाजगी शाळांमध्ये इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तीन भाषा पहिल्या इयत्तेपासूनच शिकवल्या जातात.

CBSE बोर्डाच्या शाळांमध्येही इयत्ता पहिल्यापासून इंग्रजी व हिंदी या दोन भाषा अनिवार्य असतात आणि तिसरी भाषा म्हणून संबंधित राज्याची प्रादेशिक भाषा शिकवण्याची शिफारस केली जाते.

थोडक्यात, राज्यातील अनेक खाजगी शाळांमध्ये इयत्ता पहिल्यापासूनच हिंदी शिकवली जाते. त्यामुळे आता शासकीय शाळांमध्येही मौखिक स्वरूपात हिंदीची ओळख इयत्ता पहिलीपासून करून देणे हे एक सुसंगत पाऊल ठरेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: